सातारा : मृतदेहासह पोलिस ठाण्यासमोर ठिय्या | पुढारी

सातारा : मृतदेहासह पोलिस ठाण्यासमोर ठिय्या

सातारा : पुढारी वृत्तसेवा : सातारा शहरातील कूपर कॉलनी येथे गुरुवारी मध्यरात्री कारने दुचाकी चालकाला चिरडल्याने मृत्यू झाला. भरधाव वेगातील कारने जखमी अवस्थेतील युवकाला मदत न केल्याने त्याचा मृत्यू झाला असून, अद्याप पोलिसांनी संशयित चालकाला अटक न केल्याने जमाव संतप्त बनला. यातूनच मृतदेह शाहूपुरी पोलिस ठाण्यासमोर ठेवल्याने काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. दरम्यान, पोलिसांनी आश्वासन दिल्यानंतर जमाव शांत झाला.

वसीम मुबारक कलाल (वय 40, रा. सातारा) असे अपघातात मृत्यू झालेल्या युवकाचे नाव आहे. याबाबत अधिक माहिती अशी, गुरुवारी रात्री भरधाव वेगातील स्कोडा कारने दुचाकीवरील वसीम कलाल यांना धडक दिली. कारने दुचाकीस्वाराला फरफटत नेल्याने गंभीर जखमी वसीम यांचा पाय तुटला. अपघातानंतर कार चालक तेथे न थांबता व जखमीला मदत न करता तेथून पळून गेला. गंभीर जखमी अवस्थेतील वसीम यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले.

अपघाताची माहिती कलाल कुटुंबियांना व मित्रांना समजल्यानंतर त्यांनी घटनास्थळी व रुग्णालयात धाव घेतली. मात्र वसीम यांचा मृत्यू झाल्याचे समजताच कुटुंबियांनी केलेला आक्रोश काळीज पिळवटून टाकणारा होता. कलाल कुटुंबियांनी कार चालकाची माहिती घेण्याचा प्रयत्न केला असता त्यांना काहीही माहिती मिळेना. अखेर संतप्त बनलेल्या जमावाने शुक्रवारी दुपारी 3.30 वाजण्याच्या सुमारास मृतदेह शाहूपुरी पोलिस ठाण्यासमोर नेला. या घटनेमुळे वातावरण तणावपूर्ण बनले.

संतप्त जमावाने कार चालक कोण आहे? अटक केली का? कारमध्ये कोणकोण होते? पोलिसांनी आतापर्यंत तपास काय केला? अशी प्रश्नावली विचारताच पोलिस निरुत्तर झाले. मात्र तात्काळ तपास करुन कार चालकाला अटक केली जाईल, असे आश्वासन पोलिसांनी दिले आहे.

Back to top button