सातारा : कास पठाराचे कुंपण काढण्यास प्रारंभ | पुढारी

सातारा : कास पठाराचे कुंपण काढण्यास प्रारंभ

सातारा : पुढारी वृत्तसेवा गेल्या दोन हंगामामध्ये जागतिक वारसा स्थळ असणाऱ्या कास पठारावरील फुलांची संख्या कमी होत होती. कास पठार वाचवण्यासाठी येथील गवत कमी होणे आणि जनावरांचा वावर वाढवणे या गोष्टी तज्ञांच्या समितीने वन विभागाला सांगितल्या होत्या. तसेच ११ वर्षांपूर्वी टाकलेले कुंपण हे जनावरांसाठी अडथळा बनत असून ते काढण्याची सूचनाही करण्यात आली होती. त्यानुसार गुरुवारी सकाळी कास पठारावरील कुंपणाची जाळी हटवण्याच्या कामास प्रारंभ झाला आहे.

2006 मध्ये कास पठाराला जागतिक वारसा स्थळाचा दर्जा मिळाला. हा दर्जा टिकवून ठेवण्यासाठी आणि पठाराचे संरक्षण करण्यासाठी तत्कालीन वनमंत्री स्वर्गीय पतंगराव कदम यांनी कास पठाराला कुंपण घालण्याचा निर्णय घेतला होता. 2011 मध्ये कास पठारावर तब्बल साडेसात किलोमीटर अंतराचे जाळीचे कुंपण घालण्यात आले होते. कुंपण घातल्यानंतर स्थानिकांची जनावरे पठारावर जाऊ न शकल्याने बीयांचा होणारा प्रसार कमी झाला. पर्यायाने झाडांची संख्या कमी झाली. तसेच गवतही मोठ्या प्रमाणावर वाढले. परिणामी गेल्या काही वर्षांमध्ये पठारावरील दुर्मिळ फुलांची संख्या कमी झाल्याचे दिसून आले.

फुले कमी झाल्याने कासच्या ‘जागतिक वारसा स्थळ’ या दर्जाला धक्का पोहोचणार असल्याने यावर विचार मंथन सुरू झाले होते. पर्यटन मंत्री नाम मंगल प्रभात लोढा यांनी जिल्हाधिकाऱ्यांना यावर तातडीने उपाययोजना करण्याच्या सूचनाही केल्या होत्या. प्रतापगड येथे शिवप्रताप दिनी यावर चर्चा झाली.व कास पठारावरील जाळी काढण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. पूर्ण साडेसात किलोमीटरची ही जाळी गॅस कटर च्या साह्याने काढली जाणार आहे. हंगामाच्या कालावधीत वन विभागाकडून पठाराला तात्पुरती संरक्षक जाळी बसवण्यात येणार आहे. यामुळे पुढच्या हंगामात फुलांची संख्या वाढण्यास मदत होणार आहे.

हेही वाचा

Back to top button