Satara : गुटख्यावर धाड; दारुगुत्ता मात्र नजरेआड | पुढारी

Satara : गुटख्यावर धाड; दारुगुत्ता मात्र नजरेआड

कोळकी : पोपट मिंड  : आसू, ता. फलटण येथील गुटखा विक्रेत्यावर बरड पोलिसांकडून नुकतीच कारवाई करण्यात आली. या कारवाईचे सर्व स्तरातून समाधान व्यक्त झाले. मात्र, अवैध व्यव सायावर पोलिसांकडून झालेली कारवाई केवळ फार्स असून जिथे गुटख्यावर धाड टाकली तेथून हाकेच्या अंतरावर असलेला दारूगुत्ता मात्र पोलिसांनी नजरेआड केल्याने स्थानिकामध्ये हा चर्चेचा विषय बनला आहे.

फलटण पोलीस ठाण्यांतर्गत येणार्‍या बरडर दूरक्षेत्रात बागायती पट्ट्यातील 21 गावे समाविष्ट आहेत. यातील अनेक गावे राजकीय दृष्ट्या संवेदनशील आहेत. काही गावांमधून राजरोसपणे दारु विक्री सुरू आहे. गुटख्याची विक्री तर जणू काय अत्यावश्यकच आहे अशा अविर्भावात ठिकठिकाणी सुरू आहे. जुगार, मटका, अवैद्य वाळू व्यवसाय, मुरुमाची चोरी, ऑनलाईन मटका अल्पवयीन मुलांच्याकडून सुसाट वेगाने चालवल्या जाणारी वाहने, छेडछाडीचे प्रकार या नित्याच्या बाबी घडत आहेत. अवैध व्यावसायिकांच्या या सर्व बाबी जनतेला दिसत आहेत. मात्र जनतेचे रक्षण करणार्‍या पोलिसांना का दिसत नाहीत? हा एक संशोधनाचा विषय बनला आहे. बरड दूरक्षेत्राच्या कारभार्‍यांना या सर्व बाबींची कल्पना असून देखील याकडे त्यांच्याकडून होत असलेले दुर्लक्ष नेमके कोणत्या कारणाने होत आहे? त्यांनी केलेली गुटख्यावरची धाडसी कारवाई निश्चितच आशादायक आहे. मात्र हे करत असताना त्याच गावात हाकेच्या अंतरावर असलेला दारूगुत्ता पोलिसांच्या ध्यांनी का आला नाही? का जाणीवपूर्वक त्याकडे दुर्लक्ष केले . अशी उलट सुलट चर्चा ग्रामस्थांमध्ये सुरु आहे. बरड दूरक्षेत्रातील असलेल्या गावांमधून चालणार्‍या अवैध व्यवसायामुळे बहुतांश तरुण पिढी वाया जात आहे. कमी श्रमात अधिक श्रीमंत होण्याचा मार्ग चोखाळण्याचा प्रयत्न तरुणाईकडून होत आहे. यामध्ये अवैध व्यावसायिकांचा फायदा होत असून व्यसन व अवैध व्यवसायाच्या आहारी जाणारे अनेक लोक कर्जबाजारी होत आहेत.

अनेकांचे संसार उद्ध्वस्त होत आहेत. जनतेचे रक्षक म्हणून काम करणार्‍या पोलिसांनी सतर्कता दाखवून सर्वच प्रकारच्या अवैध व्यावसायिकांच्या मुस्क्या आवळल्या पाहिजेत. कर्तव्याची जाण ठेवून सामाजिकतेचे भान ठेवत अवैध व्यावसायिकांविरुद्ध कडक कारवाई करण्याची गरज आहे. अनेक पोलिसांचे अवैध व्यावसायिकांशी सलोख्याचे संबंध असल्याचे बोलले जात आहे. बरड दूरक्षेत्राच्या प्रमुख कारभार्‍यांनी आपल्या सहकार्‍यांसमवेत अवैध व्यावसायिकांविरुद्ध मोहीम उघडण्याची आवश्यकता आहे. तसेच गुटख्यावर टाकलेली धाड तेवढ्यापुरती सीमित न राहता अन्य अवैध व्यावसायिकांवरही पोलिसांनी कारवाई करून त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याची आवश्यकता आहे. या भागातील काही ढाब्यावर राजरोसपणे दारू विक्री होत असल्याची चर्चाही दबक्या आवाजात सुरू आहे. अवैध व्यवसायाच्या बाबी पोलीसांनी नजरेआड करू नयेत एवढीच जनतेकडून मापक अपेक्षा व्यक्त होत आहे.

Back to top button