Satara : शिवरायांचा विसर पडल्याने देशाचे तुकडे; उदयनराजे भोसले | पुढारी

Satara : शिवरायांचा विसर पडल्याने देशाचे तुकडे; उदयनराजे भोसले

सातारा ; पुढारी वृत्तसेवा : छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान करण्याची घोडचूक करुनही राजीनामा न देणारा माणूस कसा असू शकतो? राज्यपालांना तातडीने न हटवल्यास मीही बघून घेतो, अशा शब्दांत खा. श्री. छ. उदयनराजे भोसले यांनी पत्रकार परिषदेत पुन्हा एकदा हल्लाबोल केला. दरम्यान, छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा विसर पडल्यामुळे यापूर्वी देशाची फाळणी झाली व तीन तुकडे झाले. आता अशीच परिस्थिती राहिली तर प्रत्येक राज्य स्वतंत्र देशाची मागणी करेल आणि राज्यांतर्गत अनेक तुकडे होतील, असा धोकाही खा.श्री.छ. उदयनराजे भोसले यांनी बोलून दाखवला.

खा. उदयनराजे भोसले म्हणाले, शिवाजी महाराजांचा अपमान करणार्‍यांना राजद्रोहाची शिक्षा झालीच पाहिजे. यावर ठोस कारवाई न केल्यास लोकांमध्येही वेगळा मेसेज जाईल. मला गहिवरुन आलं म्हणून मी हतबल झालेलो नाही. आम्ही बांगड्या भरलेल्या नाहीत. वेळप्रसंगी काय करायचे ते ठरवू पण लोकांनीही विचार करावा. राज्यात सर्व चुकीचे प्रकार सुरु असताना राज्यकर्त्यांना लाज वाटायला हवी. माध्यमांकडे संबंधितांनी भूमिका स्पष्ट करायला हवी. राज्यपाल हा राज्याचा प्रमुख असताना शिवाजी महाराजांवर विधाने करत आहेत. त्यांच्यामुळे भविष्यात मोठ्या पदावरील व्यक्तींकडूनही असा प्रकार होवू शकतो.

शिवाजी महाराजांना पकडून आग्र्याला नेण्यात आल्याचे विधान मंत्री मंगलप्रसाद लोढा यांनी केले. त्यांनी मुख्यमंत्र्यांची शिवाजी महाराजांसोबत तुलना केली. हे निदर्शनास आणून दिले असता खा. उदयनराजे म्हणाले, शिवाजी महाराज यांच्यासोबत कुणाचीच तुलना होवू शकत नाही. शिवाजी महाराजांना कुणी आग्र्याला पकडून नेलं नव्हतं. त्यांच्यात शूरता, वीरता आणि कर्तबगारी होती. औरंगजेबाने त्याठिकाणी त्यांचा विश्वासघात केला. त्यांनी कधीही माफीनामा दिला नाही. घातपात होणार हे त्यांना माहित होतं. तरीही ते आग्र्याला गेले ही त्यांची शूरता होती, असे उदयनराजे म्हणाले.

अफजलखान कबरीलगतच्या अतिक्रमण कारवाईचे श्रेय राज्यकर्त्यांना घ्यायचे आहे का? असे विचारले असता खा. उदयनराजे भोसले म्हणाले, अफजल खान हा संत नव्हता. अतिक्रमण कारवाई पूर्वीच व्हायला हवी होती.

छत्रपती शिवरायांचा इतिहास लढण्याचा आहे, रडण्याचा नाही, असे आ. शिवेंद्रराजेंनी दिलेल्या प्रतिक्रियेबाबत विचारले असता खा. उदयराजे म्हणाले, आता रडणार नाही लढणार आहे. त्यांना दाखवतोच. बोलतानाही वेदना होतात. वाईट वाटलं. मी रडलो नव्हतो. प्रत्येकजण भावना व्यक्त करतो. मी रडणार्‍यांपैकी नाही. त्यांच्या प्रोटोकॉलप्रमाणे राज्यपालांवर कारवाई करतील. 3 डिसेंबरनंतर काय करायचे ते बघू.

उदयनराजेंच्या भावना योग्य ठिकाणी पोहोचवल्या आहेत असे देवेंद्र फडणवीस यांनी स्टेटमेंट दिले आहे. याचा काही रिझल्ट मिळालाय का? असे विचारले असता खा. उदयनराजे म्हणाले, मला कुणाचा फोन आलेला नाही. संबंधित ठिकाणी पोहोचायला मी समर्थ आहे. प्रसारमाध्यमांद्वारे मी त्या ठिकाणी पोहोचलो आहे. त्यांनी माझ्या भूमिकेचे स्वागत केले असेल तर चांगलेच आहे, असेही त्यांनी सांगितले.
राज्यपालांना हटवण्याची डेडलाईन संपूनही कारवाई झाली नाही. तुम्ही आता राजीनामा देणार का? असे विचारले असता खा. उदयनराजे म्हणाले, स्ट्रॅटेजी लवकरच सांगेन. राजीनामा द्यायला माझं काय चुकले आहे का? 3 डिसेंबरला रायगडावर वेदना व आक्रोश केला जाणार आहे. समाधीस्थळावर वाचन करणार आहे.

तुम्ही थेट भूमिका का घेत नाही? भाजपमध्ये तुमची घुसमट होतेय का? असे विचारले असता खा. उदयनराजे म्हणाले, माझी भूमिका मिळमिळीत नाही. माझ्यामुळे त्यांची घुसमट होत असेल. माझ्या विचारांशी मी कधीही फारकत घेत नाही. बेधडकपणेच माझी भूमिका टप्प्याटप्प्याने मांडत आहे. स्ट्रॅटेजी ठरवताना त्यांनाही अ‍ॅक्शन घेण्यासाठी वेळ द्यायला हवा. माफी मागितली तरी पदावरुन राज्यपालांची हकालपट्टी झालीच पाहिजे, असा निर्धार त्यांनी केला.

महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादा बाबत विचारले असता खा. उदयनराजे म्हणाले, महाजन कमिटीचे हे पाप आहे. भाषावर प्रांतरचना करण्याचे ठरले होते. हा वाद मिटवायचा असेल तर केंद्र शासन, पंतप्रधान, दोन्ही राज्यांचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांची बैठक बोलवावी आणि मार्ग काढावा. पूर्वीची चूक दुरुस्त करावी, अशी मागणी त्यांनी केली.

तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेससोबत जाणार का? असे विचारले असता खा. उदयनराजे म्हणाले, सर्वजण माझ्यासोबत आहेत. कुठे जायचे, काय करायचे, रहायचे की बाहेर जायचे हे मी ठरवीन. वेळ येवू द्या. कोणकोण काय काय करतंय हे पाहू द्या. यावर पुढील अवलंबून असतं, असे त्यांनी सांगितले.

हेही वाचा

Back to top button