सातारा : वेलंगची प्राथमिक शाळा जमीनदोस्त | पुढारी

सातारा : वेलंगची प्राथमिक शाळा जमीनदोस्त

वाई; पुढारी वृत्तसेवा :  वेलंग (ता. वाई) येथील प्राथमिक शाळा जेसीबीच्या सहाय्याने जमीनदोस्त केली आहे. त्यातील शाळेच्या साहित्याचे नुकसान झाले असून याप्रकरणी राजेंद्र संपत जेधे यांच्या विरोधात वेलंगचे सरपंच सौ. विद्या पवार, उपसरपंच संजय सूर्यवंशी व शाळा समितीचे अध्यक्ष अमोल गोळे यांनी गटविकास अधिकारी नारायण घोलप, गटशिक्षणाधिकारी सुधीर महामुनी यांच्याकडे तक्रार केली. वाई पोलीस ठाण्यातही तक्रार दाखल केली आहे.

वेलंग गावातून मिळालेली माहिती अशी, शाळेची जागा स्वत:ची असल्याचा दावा राजेेंद्र जेधे यांनी केला असून आठ अ उतार्‍यावर मात्र शाळेचेच नाव आहे. शाळेच्या बाजूलाच ते राहत आहेत. शाळेची जागा त्यांच्या पूर्वजांनी 40 वर्षांपूर्वी गावाला शाळा बांधण्यासाठी दिलेली आहे. त्यामुळे त्यांचा या जागेवर कसलाही अधिकार नसल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. शाळेची खोली शनिवारी सकाळी 11 वाजता जेसीबीच्या सहाय्याने पाडून ती जागा मोकळी केली आहे. त्याला ग्रामस्थांसह सरपंच, उपसरपंच व शाळा समिती यांचा तीव्र विरोध असून राजेंद्र जेधे यांच्या विरोधात कायदेशीर कारवाई करणार असल्याचे दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे, तसेच याची वाई पोलीस
ठाण्यात तक्रार दाखल झाली असून पुढील तपास वाई पोलीस करीत आहेत. निवेदनावर ग्रामपंचायत सदस्य दीपक जेधे, शुभांगी राऊत, दत्तात्रय जेधे, लक्ष्मी गुळूंबकर, कृष्णदेव जाधव यांच्यासह ग्रामस्थांच्या सह्या आहेत.

दरम्यान, यासंदर्भात राजेंद्र जेधे यांनी म्हटले आहे की, शाळा जागेचा 7/12 आमच्या नावाचा आहे. तरी या जागेच्या बदल्यात गावाला मी दीड गुंठा जागा दिली आहे. या शाळेत विद्यार्थी बसत नव्हते. शाळा धोकादायक होवून विटा पडल्या. त्यामध्ये अपंग पुतणी जखमी झाली. ग्रामपंचायतीला अर्ज करूनही धोकादायक इमारत न पाडल्याने मला निर्णय घ्यावा लागल्याचे ते म्हणाले.

Back to top button