कराड : एमआयडीसीत ॲग्रो इंडस्ट्रीज पार्क उभारणार : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे | पुढारी

कराड : एमआयडीसीत ॲग्रो इंडस्ट्रीज पार्क उभारणार : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

कराड ; पुढारी वृत्तसेवा : एमआयडीसीमध्ये ॲग्रो इंडस्ट्रीज पार्क उभारणार अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. कराड येथे स्व. यशवंतराव चव्हाण कृषी औद्योगिक व पशुपक्षी प्रदर्शन आणि जिल्हा कृषी महोत्सवाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमास उद्योगमंत्री उदय सामंत, अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील, खासदार श्रीनिवास पाटील, खासदार रणजितसिंह निंबाळकर, आमदार बाळासाहेब पाटील, आमदार महेश शिंदे, पुरुषोत्तम जाधव, जिल्हाधिकारी रूचेश जयवंशी यांची प्रमुख उपस्थिती होती.

एकनाथ शिंदे म्हणाले, शेतकऱ्यांचे आर्थिक जीवनमान सुधारले पाहिजे यासाठी आमचे सरकार प्रयत्नशील आहे. चार महिन्यांमध्ये सरकारने शेतकऱ्यांच्या हिताचे अनेक निर्णय घेतले आहेत. शेतकरी प्रोत्साहन अनुदानांतर्गत 50 हजार रुपयांची मदत नियमित कर्जदार शेतकऱ्यांना केली आहे. अतीवृष्टीत नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना 4 हजार 750 कोटींचे वाटप आतापर्यंत केले आहे. निकषात न बसणाऱ्या शेतकऱ्यांनाही नुकसान भरपाई दिली आहे.

भूविकास बँकेच्या कर्जदार शेतकऱ्यांचे 964 कोटींचे कर्ज माफ केले आहे. शेतात नाविन्यपूर्ण उपक्रम राबवून शेतीला आधुनिकतेची जोड देऊन शेतकऱ्यांनी आपले उत्पन्न वाढवले पाहिजे. शेतकऱ्यांच्या शेती उत्पादनाला योग्य भाव मिळावा, स्थानिक भूमीपुत्रांना काम मिळावे. यासाठी एमआयडीसी मध्ये ॲग्रो इंडस्ट्रीज पार्क उभारण्यात येईल असे मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.

दरम्यान कराड विमानतळाचा विस्तार व्हावा, तेथे नाईट लँडिंग व्हावे यासाठी विमानतळाची जागा एमआयडीसीकडे वर्ग करून उद्योग विभागामार्फत येथे विमानतळ विस्तारीकरण केले जाईल असेही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी जाहीर केले.

हेही वाचा :   

Back to top button