सातार्‍यात मुलानेच केला वडिलांचा खून

सातारा ; पुढारी वृत्तसेवा : किरकोळ कारणातून घरगुती वाद झाल्यानंतर संतप्त झालेल्या मुलाने वडिलांना मारहाण करून धारदार चाकूसारख्या हत्याराने भोसकून वडिलांचा खून केला. ही घटना सातार्‍यातील मंगळवार पेठेत घडली असून, यामुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. दरम्यान, याप्रकरणी शाहूपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.

बबन पांडुरंग पवार (वय 56, रा. मंगळवार पेठ, सातारा) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. तर सूरज पवार (वय 28) असे संशयित मुलाचे नाव आहे. याप्रकरणी मृत बबन पवार यांचे भाऊ राजू पवार यांनी शाहूपुरी पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, बबन पवार हे त्यांचा मुलगा सूरज याच्यासोबत वास्तव्य करत होते. तक्रारदार राजू पवार हे त्यांचे शेजारी आहेत. दि. 13 रोजी रात्री 9 वा. बबन पवार व सुरज पवार यांच्यामध्ये घरी वाद सुरु असल्याने परिसरात जोरजोरात ओरडण्याचा आवाज ऐकू येत होता.

हा आवाज ऐकूण तक्रारदार राजू पवार हे बबन पवार यांच्या घरात गेले असता सुरज त्याच्या वडिलांना मारहाण करत होता. राजू पवार यांनी बाप-लेकामधील भांडण सोडवण्याचा प्रयत्न केला. मात्र, ते ऐकण्याच्या मनस्थितीमध्ये नव्हते.

बाप-लेकामधील वाद विकोपाला गेल्यानंतर संतप्त झालेल्या सुरज पवार याने घरातील धारदार चाकू घेवून वडिलांवर वार केला. या मारहाणीत बबन पवार यांच्या छाती व पोटालगत गंभीर जखम झाली व ते रक्तबंबाळ झाले. गंभीर जखमी अवस्थेतील बबन पवार यांना राजू पवार यांनी तात्काळ उपचारासाठी सिव्हीलमध्ये दाखल केले.

बबन पवार यांचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला असल्याचे सांगण्यात आले. या घटनेची माहिती शाहूपुरी पोलिसांना सांगितल्यानंतर त्यांनी घटनास्थळी व रुग्णालयात धाव घेतली. पोलिसांनी पंचनामा केल्यानंतर वडिलांचा खून केल्या प्रकरणी सुरज पवार याच्याविरुध्द गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु करण्यात आली.

Back to top button