सातारा : जि. प. अध्यक्ष कबुले-उदयनराजे भेट, तर्कवितर्कांना उधाण

सातारा : पुढारी वृत्तसेवा : राष्ट्रवादीचे सातारा जिल्हा परिषदेचे अध्यक्ष उदय कबुले यांनी जलमंदिर येथे जाऊन भाजपचे खासदार उदयनराजे भोसले यांची भेट घेतल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. जिल्हा मध्यवर्ती बँकेची निवडणूक प्रक्रिया सुरू असतानाच आ. मकरंद पाटील यांचे नेतृत्व मानणार्‍या उदय कबुले यांनी उदयनराजेंची जलमंदिर येथे जाऊन भेट घेतल्याने राष्ट्रवादीतील निष्ठावंतांमध्ये आश्चर्य व्यक्त होत आहे.

उदय कबुले हे शिरवळ जिल्हा परिषद गटातून अपक्ष निवडून आले होते. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष नितीन भरगुडे-पाटील यांना या मतदारसंघात उमेदवारी दिली होती. राष्ट्रवादी अंतर्गत नेत्यांनी भरगुडे-पाटील यांच्याविरोधात काम केल्याने अपक्ष कबुले निवडून आले.

पक्षाच्या अधिकृत उमेदवाराचा पराभव करणार्‍या अपक्षाला राष्ट्रवादी काँग्रेसने सामावून घेवून थेट जिल्हा परिषदेचे अध्यक्ष केले ते केवळ खंडाळा तालुक्यात आजवर जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद मिळाले नव्हते म्हणून. आ. मकरंद पाटील यांना मंत्रीपद न मिळाल्याने त्यांची नाराजी दूर करण्यासाठी ते सांगतील त्या जि.प. सदस्यास अध्यक्षपद देण्याचा निर्णय तेव्हा झाला होता त्यातून कबुले यांना लॉटरी लागली होती. पक्षाचा अधिकृत उमेदवार पराभूत झाल्यानंतर त्याच अपक्षाला जिल्हा परिषद अध्यक्ष केल्याने राष्ट्रवादीतील मातब्बर इच्छुक व निष्ठावंत कमालीचे नाराज झाले होते.

सध्या जिल्ह्यात जिल्हा मध्यवर्ती बँक व अन्य सहकारी संस्थांच्या निवडणूक रणधुमाळीचे वातावरण सुरू झाले आहे. निवडणुकांचा माहोल सुरू झाला असतानाच सोमवारी याच जिल्हा परिषद अध्यक्ष उदय कबुले यांनी भाजपाचे खासदार उदयनराजे भोसले यांची त्यांच्या जलमंदिर पॅलेस या निवासस्थानी जावून भेट घेतली. या भेटीनंतर खा. उदयनराजे भोसले यांच्या फेसबुक वॉलवरून व नंतर सोशल मीडियाच्या माध्यमातून या भेटीचा फोटो व वृत्तांत व्हायरल झाला.

जिल्हा परिषद अध्यक्ष उदय कबुले यांनी आपणाशी जिल्ह्याच्या विविध विकासकामांबाबत चर्चा केली, असे दस्तुरखुद्द उदयनराजेंच्या फेसबुक पोस्टमध्ये म्हटले आहे. त्यावरून दिवसभर तर्कवितर्काना उधाण आले. सोशल मीडियावर या फोटोवरून जोरदार कमेंटस् पडल्या असून राष्ट्रवादीच्या निष्ठावंतांनी व्यक्त केलेल्या प्रतिक्रिया खूप बोचर्‍या आहेत.

याबाबत उदय कबुले यांना विचारले असता जिल्हा परिषदेच्या हेरिटेज वास्तूंबाबत सातारा नगरपालिकेत सुनावणी सुरू असून त्यासंदर्भात आपण खा. उदयनराजेंना भेटल्याचे स्पष्टीकरण कबुले यांनी दिले आहे.

 

Back to top button