सातारा : पहाटेचा शपथविधी गद्दारी नव्हती का? - ना. शंभूराज देसाई | पुढारी

सातारा : पहाटेचा शपथविधी गद्दारी नव्हती का? - ना. शंभूराज देसाई

सणबूर; पुढारी वृत्तसेवा :  विद्यमान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत 2019 मधील विधानसभा निवडणुकीनंतर विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली होती. पहाटेच्या वेळी घेतलेली ही शपथ गद्दारी नव्हती का? अशी घणाघाती टीका राज्याचे उत्पादन शुल्क मंत्री तथा पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी विधानसभेतील विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्यावर केली आहे. त्याचबरोबर आम्हाला गद्दार म्हणाल तर सहन करून घेणार नाही, असा सज्जड इशाराही ना. शंभूराज देसाई यांनी दिला आहे.

ना. शंभूराज देसाई यांनी ढेबेवाडी विभागातील विविध विकासकामांचे भूमिपूजन केले. यामध्ये भोसगाव ते आंब्रुळकरवाडी रस्ता रुंदीकरण व सुधारणा, तसेच ढेबेवाडी, भोसगाव, उमरकांचन, जिंती मोडकवाडी, सातर रस्ता येथील मोर्‍यांचे बॉक्ससेल बांधणे आणि अतिवृष्टीमुळे तुटलेल्या रस्त्याची दुरुस्ती याशिवाय मेंढ येथे डोंगराकडील बाजूने संरक्षक भिंत बांधणे या कामांचा समावेश आहे. ना. शंभूराज देसाई यांच्या प्रयत्नांतून या कामांसाठी विविध लेखाशीर्षाखाली सुमारे 7 कोटी 93 लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे.

पालकमंत्री शंभूराज देसाई म्हणाले, राष्ट्रवादीने महाविकास आघाडीत असताना शिवसेना अक्षरशः पोखरली. निधी वाटपात पराभूत झालेल्या राष्ट्रवादीच्या नेत्यांना आमच्या पेक्षा जास्त निधी दिला गेला. महाविकास आघाडीत आमच्या सर्व आमदारांवर कायमच अन्याय होत होता. त्यामुळेच महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याचा निर्णय आम्ही 40 आमदारांनी मिळून घेतला असे ना. देसाई यांनी सांगितले.

पाटण विधानसभा मतदारसंघासह जिल्ह्याच्या विकासासाठी कटिबद्ध आहे. मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनुसार जिल्ह्याचा विकास आराखडा तयार केला जात असल्याचेही ना. देसाई यांनी सांगितले.

याप्रसंगी मोरणा शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष रविराज देसाई यांच्यासह मनोज मोहिते, विनायक साबळे, शिवाजीराव शेवाळे, टी. डी. जाधव, अंकुश महाडिक, सुरेश देशमुख, जयवंतराव देशमुख, रमेश देशमुख, दिलीप देसाई, वसंत देसाई, रामचंद्र सुतार यांच्यासह ढेबेवाडी विभागातील सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, तसेच अन्य संस्थांचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि ग्रामस्थ उपस्थित होते. प्रस्ताविक पोपटराव देशमुख यांनी केले. सूत्रसंचालन अजित शिंदे यांनी केले. आभार रणजित पाटील यांनी मानले.

Back to top button