कराड : कराडात युवकावर चाकूहल्ला; संशयिताला अटक | पुढारी

कराड : कराडात युवकावर चाकूहल्ला; संशयिताला अटक

कराड : पुढारी वृत्तसेवा : पूर्वीच्या वादाचा राग मनात धरुन शिवीगाळ, लाथाबुक्क्याने मारहाण करत एकाने युवकावर चाकू हल्ला केला. याप्रकरणी पोलिसांनी संशयिताला अटक केली आहे. कराड येथील कृष्णा घाटावर बुधवार, 2 नोव्हेंबर रोजी दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.

अनिस अय्याज शेख (वय 21, रा. मंगळवार पेठ, कराड) असे चाकू हल्ल्यात जखमी झालेल्याचे नाव आहे. तर राहुल भाऊसाहेब
पवार (रा. सोमवार पेठ, कराड) याला पोलिसांनी अटक केली आहे. अनिस शेख हा आई बरोबर कराडमधील मंगळवार पेठ परिसरात राहतो. तो मिळेल ते मजुरीचे काम करतो. सहा महिन्यांपूर्वी अनिस शेख व राहुल पवार यांच्यामध्ये वाद झाला होता. बुधवारी दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास सौरभ पवार, ओंकार कुलकर्णी यांच्याबरोबर अनिस शेख हा कृष्णा घाटाकडेला भिंतीला टेकून बसला होता.

त्यावेळी राहुल पवार याने तेथे जाऊन ‘तुला लय मस्ती आली आहे काय? तुझ्याशी माझा जुना हिशोब आहे. तुला दाखवतो,’ असे म्हणून लाथाबुक्क्यांनी मारहाण करत शिवीगाळ करून दमदाटी केली. त्यानंतर राहुल पवार याने त्याच्या जवळील चाकूने अनिस शेख याच्या गालावर, हातावर, तोंडावर, छातीवर चाकूने वार करून त्याला गंभीर जखमी केले. त्यावेळी मित्रांनी अनिस शेख याला राहुल पवार यांच्या तावडीतून सोडविले व उपचारासाठी वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालयात हलवले.

दरम्यान, राहुल पवार हा घटनास्थळावरून पळून गेला होता. उपचारानंतर शेख याने कराड शहर पोलिसात फिर्याद दिली. पोलिसांनी राहुल पवार याला सायंकाळी उशिरा अटक केली. अधिक तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल माने करत आहेत.

Back to top button