सातारा : कुळकजाईचा तलाठी ‘लाचलुचपत’च्या जाळ्यात | पुढारी

सातारा : कुळकजाईचा तलाठी ‘लाचलुचपत’च्या जाळ्यात

सातारा/दहिवडी : पुढारी वृत्तसेवा : कुळकजाई (ता. माण) येथील तलाठी युवराज एकनाथ बोराटे (वय 55, रा. धनवडेवाडी, ता. माण) याला सातबारा उतारे देण्यासाठी 4 हजार रुपयांची लाच घेताना सातारा लाचलुचपत प्रतिबंधात्मक (एसीबी) विभागाने बुधवारी रंगेहाथ पकडले.

तक्रारदार यांचे नोंदणीकृत कुलमुखत्यार पत्र व साठेखताच्या दस्ताची नोंद करून तसा सातबारा उतारा पाहिजे होता. या कामासाठी तक्रारदार तलाठी युवराज बोराटे याला भेटले. संबंधित कामासाठी तलाठ्याने 4 हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली. यामुळे तक्रारदार यांनी सातारा एसीबीमध्ये तक्रार केली. एसीबी विभागाने तक्रार घेऊन पडताळणी केली असता लाचेची मागणी झाल्याचे स्पष्ट झाले.

लाचेची रक्कम दि. 2 रोजी स्वीकारणार असल्याने सातारा एसीबीने ट्रॅप लावला. तलाठी युवराज बोराटे याने लाचेचे पैसे स्वीकारताच एसीबी विभागाने त्यांना रंगेहाथ ताब्यात घेतले. दरम्यान, तलाठी सापडल्याचे समोर येताच माण तालुक्यातील प्रशासकीय कार्यालयात खळबळ उडाली.

संशयिताला ताब्यात घेवून रात्री उशीरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु होती. दरम्यान, सातारा शहरासह जिल्ह्यात कुठेही शासकीय कार्यालयात, शासकीय अधिकारी, कर्मचारी याने लाचेची मागणी केल्यास 1060 या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन एसीबी विभागाने केले आहे.

Back to top button