सातारा : गडचिरोलीत ‘पोलिसदादाच्या खिडकी योजने’चा बोलबाला | पुढारी

सातारा : गडचिरोलीत ‘पोलिसदादाच्या खिडकी योजने’चा बोलबाला

सातारा; विठ्ठल हेंद्रे :  अतिसंवेदनशील म्हणून असणार्‍या गडचिरोलीत आदीवासींसह सर्वच नागरिकांपर्यंत शासकीय योजना पोहचवण्याचे दिव्य असते. पोलिस अधीक्षक समीर शेख यांनी दोनवर्षात ‘पोलिसदादांची खिडकी’ योजनेच्या माध्यमातून तब्बल अडीच लाख लोकांपर्यंत पोहचले. कमी कालावधीत एकाचवेळी सर्वसामान्यांपर्यंत पोहचण्याची गडचिरोली पोलिसांची ही पहिलीच वेळ ठरल्याने त्या कामाची दखल म्हणून सातारचे पोलिस अधीक्षक समीर शेख यांना ‘केंद्रीय गृहमंत्र्यांचे 2022 चे विशेष पदक’ जाहीर करण्यात आले आहे.

गडचिरोली जिल्ह्यातील बहुतांशी भाग आजही संवेदनशील आहे. नक्षलवाद्यांशी दोन हात करण्यासाठी गडचिरोलीचे लोकल सिव्हील पोलिस, एसआरपीएफ, सीआरपीएफच्या तुकड्या 24 तास तैनात असतात. गडचिरोलीतील सर्वसामान्यांचा विकास व्हावा, ते मुख्य प्रवाहात यावेत, यासाठी पोलिसांनाच अथक प्रयत्न करावे लागतात. केेंद्र व राज्य शासनाच्या अनेक योजना आहेत. या योजनांची अंमलबजावणी करणे हे पोलिसांसमोर आव्हान असते.

हीच मुख्य जबाबदारी ओळखून 2020 ते ऑक्टोबर 2022 या दोन वर्षांच्या कालावधीत सातारचे एसपी समीर शेख यांनी अनेक अभिनव उपक्रम राबवले. पोलिसदादा तसेच पोलिस भैयांची एक योजना खिडकी या त्यांच्या कल्पक योजनेमुळे केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजना गडचिरोली वासीयांपर्यंत पोहोचण्यास मदत झाली व शासनाचा हेतू सफल झाला.

सी-60 चे लीड अन् कार्यप्रणाली

काही वर्षांपूर्वी गडचिरोली आणि चंद्रपूर हे दोन्ही जिल्हे एकत्रच होते. त्यावेळी नक्षली चळवळ मोठ्या प्रमाणात सक्रीय होती. नक्षल्यांना जंगलाची माहिती असल्याने ते पोलिसांना चकमा देत होते. त्यामुळे नक्षलवाद्यांचे कट उधळण्यात पोलिसांना यश मिळत नव्हते. सन 1990 मध्ये सी-60 पथकाची स्थापना केली होती. त्यावेळी पथकामध्ये 60 जण असल्याने सी-60 असं नाव पडलं. हा प्रयोग यशस्वी झाल्याने पुढे 100,150 अशी वाढ होत आज या पथकात जवळपास 1000 जवान आहेत. यातील प्रशिक्षित जवान व स्थानिक पोलिसांना जंगलाची माहिती असल्याने त्या जोरावर मोहिमा यशस्वी होतात. गडचिरोलीत अभियान राबवताना हेच पथक सोबत असते. पोलिस अधीक्षक व तिन्ही अप्पर पोलिस अधीक्षक या पथकाचे आलटून पालटून नेतृत्व करत मोहिमा राबवतात. एसपी समीर शेख यांनीही सी-60 चे नेतृत्व केले आहे.

दोन वर्षे.. अडीच लाख लोकांशी संपर्क

एसपी समीर शेख यांनी गडचिरोलीत दोन वर्षे सेवा बजावताना गडचिरोली पोलिसांच्या माध्यमातून शासनाच्या बहुतांशी सर्व योजना पोहचवल्या. पोलिसदादाची खिडकी याचा त्यांनी पूरेपूर वापर करुन त्याची अंमलबजावणी केली. कारण गडचिरोलीमध्ये तलाठी, तहसीलदार, आरोग्यसेवा पोहचलेल्या नाहीत. या सर्वच्या सर्व सेवा पोलिसांच्या माध्यमातूनच थेट आदीवासीपर्यंत लोकापर्यंत जावून पोहचवल्या जातात. दोन वर्षात अडीच लाखांहून अधिक लोकांपर्यंत शासकीय योजना पोहचवण्याची रेकॉर्डब्रेक कामगिरी एसपी समीर शेख यांनी केली आहे.

गडचिरोलीत पोलिसांचे असे चालते काम

शासकीय योजना सर्वसामान्यांपर्यंत पोहचवण्याची खरी भिस्त पोलिसांवरच असते. यामुळे पोलिसिंग सोबतच प्रशासकीय काम चालण्यासाठी एक पोलिस अधीक्षक तीन अप्पर पोलिस अधीक्षक असतात. एक अप्पर पोलिस अधीक्षक गडचिरोलीचा दक्षिण भाग जो अहेरी म्हणून ओळखला जतो त्यासाठी नियुक्त असतो. दुसरे अप्पर पोलिस अधीक्षक ‘अभियाना’साठी तर एक अप्पर पोलिस अधीक्षक प्रशासकीय काम पाहण्यासाठी पूर्ण वेळ नियुक्त असतो. एसपी समीर शेख यांच्याकडे संपूर्ण गडचिरोली जिल्ह्याच्या प्रशासकीय कामाची जबाबदारी होती. याशिवाय त्यांनी अभियानामध्येही सहभाग घेतला आहे.

Back to top button