सातारा : दिवाळीत बहरले बचतगटांचे अर्थकारण | पुढारी

सातारा : दिवाळीत बहरले बचतगटांचे अर्थकारण

सातारा; मीना शिंदे :  सण समारंभात हंगामी व्यवसाय करणार्‍यांसाठी व्यावसायिक पर्वणीच असते. यामध्ये महिला बचतगट आघाडीवर असून यंदाही दिवाळीच्या फराळासह आकाशकंदील, डेकोरेटीव्ह पणत्या, दिवाळी कीट तयार करुन विक्री करण्यात महिला अग्रेसर राहिल्या आहेत. बचतगटाच्या सर्वच उत्पादनांच्या खरेदीला ग्राहकांमधून प्राधान्य मिळाल्याने मोठ्या प्रमाणात आर्थिक उलाढाल झाली आहे. त्यामुळे बचतगटांच्या अर्थकारणाची खर्‍या अर्थाने ‘दिवाळी’ साजरी झाली आहे.

महिलांच्या आर्थिक सबलीकरणासाठी शासनस्तरावर विविध माध्यमातून प्रयत्न केले जात आहेत. त्यापैकी एक माध्यम म्हणजे महिला बचत गट होय. कोरोना पश्चात पहिल्यांदाच मोठ्या प्रमाणावर दिवाळी साजरी होत असल्याने महिला बचत गटांनी दिवाळीच्या पार्श्वभूमीवर जोरदार व्यावसायिक तयारी केली होती. सण समारंभात हंगामी व्यवसाय करणार्‍यांसाठी दिवाळी व्यावसायिक पर्वणीच असते. यामध्ये महिला बचतगटाच्या माध्यमातून घरगुती स्वरुपात छोटे-मोठे व्यावसाय करणार्‍या महिलांचा मोठ्या प्रमाणावर समावेश असतो. यंदाही दिवाळीच्या फराळासह आकाशकंदील, डेकोरेटीव्ह पणत्या, दिवाळी किट तयार करुन विक्री करण्यात महिला बचतगट आघाडीवर राहिले. कोरोना पश्चात पहिल्यांदाच मोठ्या प्रमाणावर दिवाळी साजरी होत असल्याने महिला उद्योजिकांच्या या उत्पादनांना पसंती देण्यात आली.

देवघरातील पूजेपासून माहेरच्या फराळाच्या डब्यापर्यंत सर्वत्र बचतगटाच्या उत्पदनांनी आपले स्थान मिळवले आहे. महिलांनी तयार केलेल्या विविध प्रकारच्या आकाश कंदिलांनी अनेकांच्या घरामध्ये दिवाळीची शोभा वाढवली. पणत्या, दिवाळी किटची मोठ्या प्रमाणावर खरेदी-विक्री झाली. बाजारपेठेत बचतगटांच्या फराळाची रेलचेल अद्याप सुरुच आहे. त्यामुळे बचत गटांमध्ये लाखोंची आर्थिक उलाढाल झाली. दिवाळीनिमित्त पुणे-मुंबईसारख्या मोठ्या शहरातील चाकरमानी गावी आले होते. पै-पाहुण्यांकडे खाल्लेल्या फराळाची चव जीभेवर रेंगाळल्याने दिवाळीनंतरही परतीच्या प्रवासाला जाताना अनेकांनी घरगुती पध्दतीच्या फराळालाच प्राधान्य दिले. त्यामुळे जिल्ह्यातील काही बचत गटांच्या फराळाला जिल्ह्यासह जिल्ह्याबाहेरही मागणी राहिली.

उत्सवांमध्ये मिळतेय हक्काची बाजारपेठ

विविध सण समारंभ, उत्सवांच्या पार्श्वभूमीवर मोठ्या शहरांमध्ये यात्रा भरवल्या जातात. त्यामध्ये महिलांसाठी काही स्टॉल राखीव ठेवण्यात येतात. त्यामुळे बचत गटांच्या उत्पादनांना हक्काची बाजारपेठ उपलब्ध होत आहे. त्याचबरोबर एकाच छताखाली सर्व प्रकारचे साहित्य मिळाल्याने ग्राहकही खरेदीसाठी गर्दी करतात. दोन ते चार दिवस चालणार्‍या या यात्रांमध्ये महिला लघुउद्योजिकांच्या उत्पादनांचा प्रचार व प्रसार होत आहे. दिवाळीपूर्वी सातारा शहर व परिसरात आयोजित महोत्सवांमध्ये महिला बचतगटांच्या उत्पादनांना प्रतिसाद मिळाल्याने दिवाळीतही त्याचा मोठा फायदा झाला.

Back to top button