सातारा : तालुक्यात ग्रामपंचायत निवडणुकांचे धुमशान | पुढारी

सातारा : तालुक्यात ग्रामपंचायत निवडणुकांचे धुमशान

रेठरे बु; दिलीप धर्मे :  दीपावली उत्सवाच्या फटाक्यांबरोबरच कराड तालुक्यात ग्रामपंचायत निवडणुकीचे बार वाजू लागले आहेत. ही निवडणूक म्हणजे येणार्‍या जि.प., पं.स. ची रंगीत तालीम असणार आहे. त्यामुळे या निवडणुकीला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.

रेठरे बु जि.प.गटातील रेठरे खुर्द,आटके, जुळेवाडी, गोंदी, तसेच वडगाव हवेली, कोरेगाव, जि.प. मधील वडगावसह दुशेरे, वारूंजी जि.प.तील विजयनगर, वनवासमाची,येळगाव जि.प.तील येळगावसह, हनुमंतवाडी, मनव, घराळवाडी, गणेशवाडी व हवेलीवाडी.कोळे जि.प.तील. कसूर तारूख, वानरवाडी. तर काले जि.प.तील ओंडोशी, का.शिरंबे यासह तालुक्यातील अन्य गावांचा समावेश आहे. ग्रामपंचायत निवडणुकीचे वारे वाहू लागल्याने संभाव्य उमेदवारांची धावधाव सुरू झाली आहे.

गेली अनेक वर्षांच्या राजकीय परंपरेनुसार गटतट, पक्ष भावकी, तसेच उमेदवारीवरून हेवेदाव्यांना आता सुरुवात झाली आहे. पण निवडणुकीत विजय झाल्यानंतर बहुतांश सदस्य ग्रामपंचायतीकडे फिरकतदेखील नाहीत याचे काय? ही वस्तुस्थिती आता जनतेसमोर आली आहे. प्रतिष्ठा, नावापुरते किंवा एकमेकांच्या जिरवा जिरवीसाठी निवडणूक न लढवता लोकांसाठी वेळ देऊन गावच्या विकासासाठी झटणारे उमदे नेतृत्व लोकांना हवे आहे. याचा विचार राजकीय नेते, स्थानिक पक्ष पातळीवर होणे अत्यंत गरजेचे झाले आहे.

काही गावचे सरपंचपद हे खुल्या वर्गासाठी असल्याने अनेकांनी गुडग्याला बाशिंग बांधले आहे. पार्टी, नेतृत्व, पक्ष आदलाबदल करणार्‍यांनाही या निवडणुकीत कमालीचा भाव येणार असून जिंकणे हाच अजेंडा असला तरी जुने, निष्ठावंत पूर्वीच्या शिलेदारांकडेही दुर्लक्ष करून चालणार नाही. नेत्यांनी निष्ठावंतांना संधी देण्याची गरज व्यक्त होत आहे.

फायद्यासाठी तडजोडीचे राजकारण थांबण्याची अपेक्षा…

ग्रामपंचायत मतांची आकडेवारी पाहिली तर अनेक गावात विशिष्ट उमेदवारांनाच जास्त मतदान होत असते.किंबहुना विरोधकांना हाताच्या बोटावर मोजण्या एवढेच मते असतात. परंतु त्यानंतर जि.प.,पं.स.किंवा विधानसभा उमेदवारांना या गावात अपेक्षेपेक्षा खूपच कमी मते पडतात. याचाच अर्थ त्याठिकाणी स्वतःसाठी सोयीस्कर तडजोडीचे राजकारण होताना दिसत आहे. हे कुठेतरी थांबले पाहिजे. ही निष्ठावंत कार्यकर्त्याची अनेक वर्षांची खदखद आहे.

या ग्रामपंचायतींचे धुमशान…

21 ऑक्टोबर रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होणार आहे. अंधारवाडी आणि आरेवाडी, आटके, चिंचणी, चोरजवाडी, धावरवाडी, दुशेरे, गणेशवाडी, घराळवाडी, घोलपवाडी, गोंदी, हनुमंतवाडी, हवेलीवाडी, हिंगनोळे, जुळेवाडी, जुने कवठे, कळंत्रेवाडी, कोरेगाव, कुसूर, मनु, पाडळी-हेळगाव, रेठरे खुर्द, साबळवाडी, तारुख, वानरवाडी, वनवासमाची-खोडशी, अंतवडी, डेळेवाडी, कालगाव, कासारशिरंबे, मस्करवाडी, ओंडोशी, शामगाव, सुपने, तळबीड, विजयनगर, वडगाव हवेली, येळगाव, भांबे, पश्चिम सुपने, चरेगाव, हनुमानवाडी या ग्रामपंचायतींची निवडणूक होत आहे.

Back to top button