सातारा : दिवाळीसाठी एसटीचा सातारा विभाग सज्ज | पुढारी

सातारा : दिवाळीसाठी एसटीचा सातारा विभाग सज्ज

सातारा; पुढारी वृत्तसेवा :  दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर प्रवाशांच्या गर्दीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचा सातारा विभाग सज्ज झाला आहे. सातारा स्वारगेट, फलटण, कराड, वाई आगाराच्या स्वारगेट मार्गावर सुमारे 111 जादा बसेस सोडण्यात येणार आहेत. तसेच विविध आगारांतून जादा बसेसचे नियोजन करण्यात आले आहे.

दि. 17 ते 31 ऑक्टोबर या कालावधीत पुणे स्वारगेटवरुन येणार्‍या व जाणार्‍या प्रवाशांची गर्दी मोठ्या प्रमाणात होणार असल्याने प्रवासी गर्दीनुसार जादा वाहतुकीचे नियोजन करण्यात आले आहे. सातारा आगाराने सातारा-स्वारगेट (विनाथांबा, विनावाहक) मार्गावर दैनंदिन 56 फेर्‍या सोडण्यात येणार आहेत.

वाई आगाराने वाई-स्वारगेट मार्गावर दररोज 30 फेर्‍या, फलटण आगाराच्या फलटण-स्वारगेट मार्गावर 9 फेर्‍या, फलटण-पुणे स्टेशन मार्गावर 6 फेर्‍या, कराड आगाराने कराड-स्वारगेट मार्गावर दैनंदिन 10 फेर्‍या सोडण्यात येणार आहेत.

दि. 20 रोजी स्वारगेटवरुन सातारसाठी सर्वच आगाराच्या सुमारे 12 बसेस, स्वारगेट कराड मार्गावर कराड व पाटण आगाराच्या 8 बसेस, स्वारगेट महाबळेश्वर मार्गावर महाबळेश्वर आगाराच्या 5 बसेस, स्वारगेट वाई मार्गावर वाई आगाराच्या 5 बसेस, स्वारगेट फलटण मार्गावर फलटण आगाराच्या 8 बसेस, दि. 21 रोजी स्वारगेट सातारा मार्गावर कोरेगाव, खंडाळा, वाई, मेढा, वडूज, दहिवडी आगाराच्या 25 बसेस, स्वारगेट कराड मार्गावर कराड व पाटण आगाराच्या 14 बसेस, स्वारगेट महाबळेश्वर मार्गावर महाबळेश्वर आगाराच्या 5 बसेस, स्वारगेट वाई मार्गावर वाई आगाराच्या 5 बसेस, स्वारगेट फलटण मार्गावर फलटण व खंडाळा आगाराच्या 20 बसेस धावणार आहेत. 31 ऑक्टोबरपर्यंत सर्वच आगारातून पुणे येथे येण्यासाठी जादा बसेस सोडण्यात येणार आहेत.

ऐन दिवाळीच्या सणासुदीच्या काळात एसटीचे चालक व वाहक कुटुंबापासून दूर असतात. त्यांच्यात एकटे आहोत ही भावना येऊ नये, यासाठी सातारा विभागात नरक चुतर्थीला अभ्यंगस्नानाचे आयोजन केले आहे. तसेच चालक-वाहकांना फराळाचे वाटप करण्यात येणार आहे.
– रोहन पलंगे, विभाग नियंत्रक, सातारा

Back to top button