सातारा : प्रज्ञाशोध परीक्षेबाबत विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम; शिक्षण विभाग अनभिज्ञ | पुढारी

सातारा : प्रज्ञाशोध परीक्षेबाबत विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम; शिक्षण विभाग अनभिज्ञ

सातारा; पुढारी वृत्तसेवा : नवीन शैक्षणिक वर्षातील पहिले सत्र संपत आले तरी दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी घेण्यात येणार्‍या राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षेबाबत अद्याप कोणत्याच सूचना शिक्षण विभागाकडे आलेल्या नाहीत. सर्वप्रकारच्या शिष्यवृत्तींसाठी लाभार्थ्यांचे अर्ज भरण्यासाठी वारंवार मुदतवाढ दिली जात असताना या परीक्षेबाबत कोणतेच सूतोवाच शैक्षणिक वर्तुळात केले जात नाही. या वर्षात ही योजना सुरु ठेवण्याबाबतची मंजुरी केंद्रीय शिक्षण मंत्रालयाकडून राज्याच्या शिक्षण विभागाकडे आलेली नाही. त्यामुळे यावर्षी प्रज्ञावंत विद्यार्थ्यांसाठी घेतली जाणारी ही परीक्षा होणार की नाही याबाबत संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे.

राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षा केंद्रीय शिक्षण मंत्रालयामार्फत देशपातळीवर घेण्यात येते. त्यासाठी समन्वयक म्हणून एनसीईआरटी म्हणजेच राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद काम करते. दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी राज्य व राष्ट्रीय पातळीवर ही परीक्षा घेतली जाते. राष्ट्रीय पातळीवरील गुणवत्ता यादीत स्थान मिळवलेल्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती दिली जाते. नवीन शैक्षणिक वर्ष सुरु झाल्यावर शैक्षणिक नियोजनानुसार ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये सर्व प्रकारच्या शैक्षणिक शिष्यवृत्ती परीक्षांचे अर्ज भरण्याबाबत विद्यार्थ्यांना सूचना दिल्या जातात. मात्र, यावर्षी नवीन शैक्षणिक वर्षातील पहिले सत्र संपत आले तरी दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी घेण्यात येणार्‍या राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षेबाबत अद्याप कोणत्याच सूचना शिक्षण विभागाकडे आलेल्या नाहीत.

सर्व प्रकारच्या शिष्यवृत्तींसाठी लाभार्थ्यांचे अर्ज भरण्यासाठी वारंवार मुदतवाढ देण्यात येत असताना या परीक्षेबाबत कोणतेच सूतोवाच शैक्षणिक वर्तुळात केले जात नाही. दिवाळी सुट्टी आठ दिवसांवर आली असताना शाळांना कोणत्याच सूचना मिळाल्या नाहीत. या वर्षात ही योजना सुरु ठेवण्याबाबतची मंजुरी केंद्रीय शिक्षण मंत्रालयाकडून राज्याच्या शिक्षण विभागाकडे आलेली नाही. त्यामुळे राष्ट्रीय प्रज्ञाशोध योजनेला यावर्षी स्थगिती मिळण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. मात्र, याबाबत स्पष्ट आदेश नसल्याने विद्यार्थ्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे.

Back to top button