सातारा : कास महोत्सवाला आ. शिवेंद्रराजेंचा विरोध | पुढारी

सातारा : कास महोत्सवाला आ. शिवेंद्रराजेंचा विरोध

सातारा;  पुढारी वृत्तसेवा :  कास महोत्सव शासनाच्या माध्यमातून होतोय का काही खासगी डान्स क्लासेस चालवणार्‍या लोकांच्या आग्रहाखातर होतोय, त्या व्यक्तींना चार पैसे मिळावेत म्हणून कोणाच्या बगलबच्चांची घरे चालवण्यासाठी हा आटापिटा सुरु आहे? नेत्यांच्या जवळ असणार्‍या डान्स क्लासेसवाल्यांनी पैसे मिळावेत, यासाठी डान्स शो, लेजर शो ठेवला असून हे चुकीचे आहे, अशा शब्दात आ. शिवेंद्रराजे भोसले यांनी या महोत्सवाला विरोध दर्शवला.

माध्यमांशी बोलताना आ. शिवेंद्रराजे भोसले म्हणाले, ‘कास महोत्सव’ या नावाखाली महोत्सव घ्यायचे काम सुरु आहे. ‘कास हे इको सेन्सिटिव्ह’ या पर्यावरण गोष्टीने गाजत आहे. पर्यावरणाची हानी होऊ नये, असे असताना कास महोत्सवाच्या नावाखाली वृक्षतोड करण्यात आली आहे. यावर वनविभागाने लक्ष देवून कारवाई करणे गरजेचे आहे. महोत्सव करायचा असला तर प्रशासनाने स्वतः करावा. खासगी लोकांना कॉन्ट्रॅक्ट देऊन करू नये. यासाठी पर्यटन विभागाने आदेश काढले आहेत का? शासनाने परिपत्रक काढले आहे का? डीपीडीसीतून काही नियोजन केले आहे का? या गोष्टी लोकप्रतिनिधी म्हणून आमच्याकडे आलेल्या नाहीत. मग हा महोत्सव होतोय कशातून, त्याला देण्यात येणारा निधी कोणाच्या आग्रहामुळे व का दिला जात आहे? हे उघड होणे गरजेचे आहे. याचे उत्तर जिल्हा प्रशासनाने दिले पाहिजे, असेही आ. शिवेंद्रराजे म्हणाले.

कासला पर्यटक यायला पाहिजेत, पर्यटक आल्याने सातार्‍याच्या बाजारपेठेला, हॉटेल व्यावसायिकांना फायदा होत आहे. रस्ते सुंदर केले आहेत. पठारावरील खराब रस्त्याचे काम लवकरच सुरु होईल. कासचे पर्यावरण जपणे गरजेचे आहे. आता आयोजित केलेल्या महोत्सवाच्या नावाखाली वृक्षतोड होत असेल तर ती दुर्दैवी गोष्ट आहे. महोत्सव जिल्हा प्रशासन किंवा पर्यटन विभागाने स्वतः घ्यावेत. खासगी लोकांना पैसे मिळावे म्हणून किंवा कोणी तरी पत्र देतेय म्हणून होवू नयेत. आपल्या बगलबच्यांची घरे चालवण्यासाठी हा महोत्सव होतोय का? याबाबत योग्य ठिकाणी तक्रार करणार असल्याचे आ. शिवेंद्रराजेंनी सांगितले.

कास पठारावर जी हॉटेल बांधली आहेत ती त्या व्यावसायिकांनी स्वतःच्या जागेत बांधली आहेत. मात्र काही जणांंनी सर्व मंजुर्‍या घेणे गरजेचे होते तसे झाले नाही. याबाबत पुढील प्रक्रिया सुरु आहे. एकीकडे व्यावसायिकांना नोटिसा द्यायच्या आणि दुसरीकडे तीन दिवसांसाठी झाडे तोडायची. 70 ते 75 लाख रुपये खर्च करायचा. कोणत्यातरी खासगी मालकांसाठी हा उद्योग सुरु आहे. हा शासनाचा पैसा असून करदात्याच्या पैशाची लूट थांबली पाहिजे, असेही आ. शिवेंद्रराजेंनी सांगितले.

Back to top button