सातारा : शिक्षक बँकेच्या रणधुमाळीचा मार्ग मोकळा | पुढारी

सातारा : शिक्षक बँकेच्या रणधुमाळीचा मार्ग मोकळा

सातारा; पुढारी वृत्तसेवा : आपत्तीजन्य परिस्थितीमुळे नव्या सरकारने राज्यातील सहकारी संस्थांच्या निवडणुका स्थगित केल्या होत्या. मात्र, तीन महिन्यांची मुदत संपल्यानंतर सरकारने या निवडणुका घेण्याचे आदेश पुन्हा दिले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील शिक्षक, रयत, सैनिक आणि जनता अर्बन बँकेसह 207 संस्थांच्या निवडणुका पुन्हा स्थगित केलेल्या टप्प्यापासून पुढे सुरू होणार आहेत.

दसर्‍यानंतर उपनिबंधक व दुय्यम निबंधक कार्यालयात कार्यवाहीला वेग येणार आहे. दोन वर्षे कोरोनात गेल्यानंतर राज्यामध्ये 31 मार्च 2022 पर्यंत पेंडिंग राहिलेल्या सहकारी संस्थांच्या निवडणुका घेण्याचे आदेश महाविकास आघाडी सरकारने दिले होते. त्यानुसार त्याची कार्यवाही सुरू होती. मात्र, जुलै महिन्यात सत्ताबदल झाला. सत्ताबदलानंतर नव्या सरकारने आपत्तीजन्य परिस्थितीमुळे मतदारांना मतदानाचा हक्क बजावता येत नसल्याचे कारण देत 30 सप्टेंबरपर्यंत सहकारी संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलल्या होत्या. मात्र, आता याची मुदत संपल्यानंतर या निवडणुका घेण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. त्यानुसार राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाचे सचिव पी.एल. खंडागळे यांनी आदेश दिले आहेत. त्यानुसार ज्या टप्प्यावर निवडणुका स्थगित केल्या होत्या त्याच टप्प्यावर आता पुढील कार्यक्रम सुरू होणार आहे. या निर्णयामुळे सातारा जिल्ह्यातील अ, ब, क आणि ड वर्गातील 207 सहकारी संस्थांच्या निवडणूका पुन्हा सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. यामध्ये अ व ब वर्गातील 56 तर क आणि ड वर्गातील 151 संस्थांचा समावेश आहे.

चौथ्या टप्प्यात ब वर्गातील एकूण 77 संस्थांचा कार्यक्रम लागला होता. परंतु, यातील 10 संस्था अक्रियाशील असल्याने त्या अवसायनात काढण्यात आल्या. तर या निर्णयपूर्वीच 9 संस्था या बिनविरोध पार पडल्या आहेत. तर 56 इतर संस्थांचा कार्यक्रम आता सुरू होणार आहे. सातार्‍यातील प्राथमिक शिक्षक सहकारी बँक, रयत सेवक बँक, कर्नल आर. डी. निकम सैनिक सहकारी बँक, वाईतील जनता अर्बन बँक या बँकांची रणधुमाळी पुन्हा एकदा सुरू होणार आहे. याचबरोबर प्रत्येक तालुकास्तरावर क आणि ड वर्गातील काही संस्थांच्या निवडणुका लागल्या होत्या. याची माहिती जिल्हा उपनिबंधक कार्यालयास कळवली गेली होती. यामध्ये क वर्गातील 116 आणि ड वर्गातील 35 सहकारी संस्थांचाही कार्यक्रम लागणार आहे.

Back to top button