सातारा रेल्वे स्थानकाला गड-किल्ल्यांचा ‘लूक’ | पुढारी

सातारा रेल्वे स्थानकाला गड-किल्ल्यांचा ‘लूक’

सातारा; प्रवीण शिंगटे : सातार्‍याचे ऐतिहासिक व धार्मिक महत्त्व प्रवाशांना कळावे. पर्यटकांमध्ये वाढ व्हावी. या उद्देशासाठी रेल्वे प्रशासनाने अनोखे पाऊल उचलले आहे. सातारा रेल्वे स्थानकाच्या प्रवेशद्वाराला संगम माहुली व क्षेत्र माहुली, सज्जनगड, अजिंक्यतारा, राजवाडा व जलमंदिर या ऐतिहासिक वास्तूंचा लूक दिला जात आहे. त्यामुळे सातारा रेल्वे स्थानकाला ऐतिहासिक स्वरूप प्राप्त होत आहे.

मध्य रेल्वेच्या पुणे-सातारा मार्गात जेजुरी स्थानकाला तेथील देवस्थानामुळे महत्त्व आले आहे. या रेल्वे स्थानकाला मल्हार गडाचा लूक देण्यात आला आहे. त्याचप्रमाणे सातारा रेल्वे स्थानकाला ऐतिहासिक गड किल्ल्यांचा लूक देण्याचा प्रयत्न मध्यरेल्वे मार्फत सुरू आहे. सातारा जिल्ह्याला फार मोठी ऐतिहासिक परंपरा आहे. गड, किल्ले, ऐतिहासिक व हेरिटेज वास्तू, जागतिक वारसा स्थळ असलेले कास पुष्प पठार यामुळे जिल्ह्याची ओळख देशासह परदेशात पोहोचली आहे. पहिल्या टप्प्यात सातारा रेल्वे स्थानकात जिल्ह्यातील वन्य प्राणी व कास पुष्प पठारावरील विविध रंगी फुलांची चित्रे रेखाटण्यात आली होती. त्यानंतर आता ऐतिहासिक गड किल्ल्यांचा लूक देण्याचे नियोजन रेल्वे मंत्रालयाने हाती घेतले आहे. त्यासाठी रेल्वे प्रशासनाच्या समितीने संगम माहुली, क्षेत्र माहुली, किल्ले सज्जनगड, किल्ले अजिंक्यतारा, ऐतिहासिक राजवाडा, जलमंदिराची पाहणी केली होती. समितीच्या या पाहणीनंतर सातारा रेल्वे स्थानकावर नव्याने मुख्य प्रवेशद्वार उभारण्यात येत आहे. त्या ठिकाणी संगम माहुली, क्षेत्र माहुली, किल्ले सज्जनगड, किल्ले अजिंक्यतारा, ऐतिहासिक राजवाडा, जलमंदिरमधील विविध ऐतिहासिक गोष्टींचा काही भाग साकारण्यात आला आहे. आकर्षक प्रवेशद्वार, कोरीव व नक्षीकाम असलेले खांब, गोलाकार घुमटामुळे रेल्वे स्थानकाला किल्ल्याचा लूक आला आहे. हे काम सध्या युद्धपातळीवर सुरू आहे. हे काम 2 ते 3 महिन्यांत पूर्ण होणार आहे. सातारा रेल्वे स्थानकाला ऐतिहासिक गड व किल्ल्यांचा लूक देण्यात येत असल्याने स्थानक कात टाकू लागले आहे. या ऐतिहासिक लूकमुळे बाहेरील पर्यटकांनाही सातार्‍याची महती कळणार आहे. सध्या पुणे ते मिरज लोहमार्ग दुहेरीकरण व विद्युतीकरणाचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. हे काम पूर्ण झाल्यानंतर रेल्वेची संख्या वाढणार आहे. तसेच सातारा रेल्वे स्थानकात रेल्वे विविध कार्यालयांच्या इमारती उभारणीचे कामही सुरू आहे.

Back to top button