‘नवीन महाबळेश्वर’ प्रकल्पाला नव्याने गती | पुढारी

‘नवीन महाबळेश्वर’ प्रकल्पाला नव्याने गती

पाचगणी; इम्तियाज मुजावर : थंड हवेचे ठिकाण म्हणून प्रसिद्ध असलेल्या सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर शेजारीच नवीन महाबळेश्वर प्रकल्प नव्याने निर्माण केला जात आहे. सातारा, जावली व पाटण तालुक्यातील 52 गावांचा समावेश या प्रस्तावित प्रकल्पांमध्ये करण्यात आला आहे. त्यामुळे जिल्ह्याच्या पर्यटन विकासाला नवा लूक मिळणार आहे.

नव्याने केला जात असलेल्या नवीन महाबळेश्वर प्रकल्प विकास आराखडा तयार करण्याचे काम सुरू झाले असून तीन वर्षांत आराखडा पूर्ण केला जाणार आहे. राज्यातील प्रमुख गिरीस्थानांमध्ये महाबळेश्वर, पाचगणी, माथेरान, लोणावळा, खंडाळा आदींचा समावेश होतो. महाबळेश्वरला पर्यटकांची मोठी पसंती असते. येथील पर्यटकांची गर्दी वाढू लागली आहे. त्यातून या ठिकाणी येणारा ताण कमी करण्यासाठी नवीन गिरीस्थान विकसित करण्याची गरज निर्माण झाली होती. त्यातून कोयना बॅक वॉटरच्या भागातील सुमारे 37 हजार हेक्टर क्षेत्रावर नवीन महाबळेश्वर निर्माण करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

हा निसर्गरम्य परिसर सह्याद्री उत्तर दक्षिणेला समुद्र सपाटीपासून सुमारे 1200 मीटर उंचीवर आहे. या भागातून सोळशी, उरमोडी, कांदाटी या उपनद्या बहतात. यामुळे हा परिसर हिरवागार आणि नयनरम्य आहे. त्याचबरोबर घनदाट जंगल, वन्यजीव, धबधबे, तलाव, ऐतिहासिक वास्तू यांची मोठी देणगी लाभली आहे. राज्य सरकारने या प्रकल्पासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाची विशेष नियोजन प्राधिकरण म्हणून (एमएसआरडीसी) सन 2019 मध्ये नियुक्ती केली.

याच वर्षी या प्रकल्पाचा विकास आराखडा तयार करण्याचे काम सुरू होणार होते, मात्र, कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे तीन वर्षे प्रकल्पाच्या कामाला ब्रेक लागला होता. एमएसआरडीसीकडून महिनाभरात या क्षेत्राचा भूवापर नकाशा तयार करण्याचे काम हाती घेतले जाणार आहे. ड्रोन आणि जीआय सर्वेक्षणाच्या आधारे ते पूर्ण केले जाणार आहे. इतिहासप्रेमी या भागात आकर्षित होतील. पर्यटकांसाठी सोयीसुविधा आणि अस्तित्वातील रस्त्यांचे जाळे सुधारले जाणार आहे. रिसॉर्ट आणि कृषी पर्यटन विकसित केले जाणार आहे.

नवीन महाबळेश्वरचा विकास आराखडा तयार करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून आराखडा मंजुरीसाठी पुढील तीन वर्षांचा कालावधी लागेल, अशी माहिती एमएसआरडीसीचे व्यवस्थापकीय संचालक राधेश्याम मोपलवार यांनी दिली.

पर्यटनातून स्थानिकांना मिळणार रोजगार

नवीन महाबळेश्वरमध्ये सातारा तालुक्यातील ठोसेघर, चाळकेवाडी, आलवडी, जांभे, चिखली, जावली तालुक्यातील अंधारी, कास, कसबे बामणोली, सावरी तर पाटण तालुक्यातील गोषटवाडी, आंबेघर तर्फ, बागलवाडी, सावरघर, चाफोली आदी गावांचा समावेश असेल. नवीन महाबळेश्वरच्या परिसरात अनेक ऐतिहासिक ठिकाणे आहेत. 52 गावांतील पर्यटनस्थळे आणि ऐतिहासिक ठिकाणे शोधून त्यांचा विकास केला जाईल.

Back to top button