सातारा : मेट्रो ब्लड बँकेचा प्रस्ताव लालफितीतच; रूग्णांना आर्थिक भुर्दंड | पुढारी

सातारा : मेट्रो ब्लड बँकेचा प्रस्ताव लालफितीतच; रूग्णांना आर्थिक भुर्दंड

सातारा; विशाल गुजर :  जिल्हा रुग्णालयातील रक्त घटक स्वतंत्र करण्याची सुविधा असलेल्या मेट्रो ब्लड बँकेचा प्रस्ताव 8 वर्षे लाल फितीच्या कारभारामुळे लटकला आहे. त्यामुळे इमारत उभी असूनही जिल्ह्यातील सामान्य रुग्णांना रक्त घटकांसाठी आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. त्याचबरोबर रक्तदात्याला स्वतंत्र रक्तघटक मिळत नसल्याने जिल्हा रुग्णालयातील रक्तपेढीचे संकलनही कमी होऊ लागले आहे.

रक्तामध्ये लाल रक्तपेशी, प्लाझ्मा व प्लेटलेट असे घटक असतात. वैद्यकीय क्षेत्रातील क्रांतिकारी संशोधनामुळे रक्तातील हे घटक स्वतंत्र करता येणे शक्य झाले आहे. रुग्णाला त्याच्या आवश्यकतेनुसार हे घटक देणे शक्य झाले आहे. त्यामुळे आवश्यकता नसतानाही संपूर्ण रक्त रुग्णाला द्यावे लागत आहे. रक्तक्षय, किडनी व हृदयविकार तसेच थॅलेसीमियाच्या रुग्णांना रक्तवाढीसाठी लाल रक्तपेशींची गरज असते. भाजून जखमी झालेल्या तसेच जलोदराचा आजार, डेंग्यू व कर्करोगाच्या रुग्णांना प्लेटलेट आवश्यक असतात. त्यांना संपूर्ण रक्त देण्याची गरज नसते. आवश्यक तो घटक दिल्यामुळे रुग्णांच्या प्रकृतीत तातडीने सुधारणा होते.

रुग्णांची ही अडचण ओळखून शासनाने जिल्हा रुग्णालयामध्ये रक्त विघटनाची सोय उपलब्ध करण्याचा निर्णय 8 वर्षांपूर्वी घेतला आहे. त्यानुसार जिल्हा रुग्णालयात आवश्यक त्या मशीनरीही दाखल झाल्या. परंतु, आवश्यक असणारी इमारत उपलब्ध नव्हती. त्यामुळे जिल्हा रुग्णालयातील आलेल्या मशीन पुन्हा पुण्याच्या मेट्रो ब्लड बँकेकडे पाठवल्या गेल्या. आता इमारत उभी राहून 6 वर्षे झाली आहेत. सध्या या इमारतीत कोरोना टेस्टिंग लॅब सुरु आहे. परंतु, लाल फितीच्या कारभारात ब्लड बँकेचे काम रखडले आहे. त्यामुळे रुग्णांना आर्थिक भुर्दंड सोसावा लागत आहे. जिल्हा रुग्णालयातील ब्लड बँकेमुळे आता दुसरीच अडचण भासू लागली आहे. खासगी रुग्णालयामध्ये बहुतांश डॉक्टर स्वतंत्र रक्तघटकच रुग्णाला सांगत असतात. त्यामुळे ज्या ब्लड बँकेत अशी सुविधा आहे, तेथेच रक्तदान करण्याकडे लोकांचा कल वाढला आहे. त्यामुळे जिल्हा रुग्णालयातील रक्तपेढीच्या संकलनावर परिणाम होऊ लागल्याचे चित्र आहे.

लोकप्रतिनिधींनी लक्ष घालणे गरजेचे

जिल्ह्यातील विकासासाठी लोकप्रतिनिधी लक्ष घालतात. नुकताच सत्ता बदल झाला आहे. सध्या मुख्यमंत्री असणारे ना. एकनाथ शिंदे हे सातारा जिल्ह्याचे आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील विकासकामांना वेग येण्याची चिन्हे आहेत. त्या विकासामध्ये जिल्हा रुग्णालयाच्या विकासामध्ये मेट्रो ब्लड बँक एक महत्वाचा भाग ठरू शकतो. त्यामुळे जिल्ह्यातील सर्वसामान्य लोकांना रक्त घटकासाठी बसणारा आर्थिक भुर्दंड कमी होऊ शकतो. त्यामुळे लोकप्रतिनिधीनी याकडे लक्ष घालावे, अशी मागणी जोर धरत आहे.

Back to top button