सातारा : साखर कारखाने, शेतकर्‍यांच्या प्रश्नांसाठी आग्रही भूमिका घेऊ - शंभूराज देसाई | पुढारी

सातारा : साखर कारखाने, शेतकर्‍यांच्या प्रश्नांसाठी आग्रही भूमिका घेऊ - शंभूराज देसाई

सणबूर; पुढारी वृत्तसेवा :  राज्यातील सहकारी साखर कारखान्यात तयार होणार्‍या साखरेला योग्य भाव मिळाला पाहिजे. राज्य शासन सहकार क्षेत्र बळकट करण्यासाठी नेहमीच प्रयत्नशील आहे. सध्या देशात 85 लाख टन साखर शिल्लक आहे. केंद्र सरकारकडे सहकारातील काही प्रश्न अद्यापही प्रलंबित असून हे प्रश्न प्राधान्याने सोडविण्यासाठी राज्य शासन केंद्राकडे आग्रही मागणी करेल, असे प्रतिपादन राज्याचे उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनी केले.

लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याची 52 वी वार्षिक सर्वसाधारण सभा मंत्री शंभूराज देसाई यांचे मार्गदर्शनाखाली झाली. यावेळी कारखान्याचे चेअरमन यशराज देसाई, मोरणा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष रविराज देसाई, आदित्यराज देसाई, अशोकराव पाटील, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख जयवंतराव शेलार, डॉ.दिलीपराव चव्हाण, व्हाईस चेअरमन पांडुरंग नलवडे, सर्व संचालक, विविध क्षेत्रातील मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.

मंत्री शंभूराज देसाई म्हणाले, केंंद्र सरकारने साखर निर्यातीबाबतच्या अडचणी दूर केल्यास कारखानदारी अडचणीतून बाहेर येण्यास मदत होणार आहे. त्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली केंद्र सरकारकडे आग्रही मागणी करणार आहे. लोकनेते बाळासाहेब देसाई आणि स्व. शिवाजीराव देसाई यांच्या आदर्श विचारांवर चालणार्‍या या कारखान्याने शेतकर्‍यांना इतर कारखान्याप्रमाणे एफआरपीनुसार दर दिल्याचा अभिमान असल्याचेही मंत्री देसाई यांनी सांगितले.

यशराज देसाई म्हणाले, कारखान्याच्या विस्तारीकरणाचे काम सुरू आहे. हे काम दोन टप्प्यांत पूर्ण करण्याचे असून पहिल्या टप्प्याचे काम 80 टक्के झाले असून, उर्वरित 20 टक्के काम पूर्ण करणार आहे. त्याचबरोबर दुसर्‍या टप्प्याच्या कामाला लवकरच सुरुवात करण्यात येणार आहे. कारखान्याच्या विस्तारीकरणामुळे कारखान्याच्या गाळप क्षमतेमध्ये वाढ होणार आहे. निर्यात बंदीमुळे काही अडचणी निर्माण झाल्या असल्या तरी दिवाळीपूर्वी शेतकर्‍यांना एफआरपीची रक्कम 100 टक्के देण्यासाठी कटिबद्ध असल्याचेही यशराज देसाई यांनी सांगितले. दरम्यान, या सभेत विषयपत्रिकेवरील आणि ऐनवेळेच्या सर्व विषयांना एकमताने मंजुरी देण्यात आली.

पाटणकरांनी लोकनेत्यांना धोका दिला…

लोकनेते बाळासाहेब देसाई यांनी पाटण तालुक्याचे नंदनवन करत राज्याला नवी दिशा दिली. मात्र पाटणकरांनी लोकनेत्यांना धोका दिला. ज्यांना बोटाला धरून राजकारणात आणले, त्यांच्याशी दगाबाजी केली गेली. बिनविरोध निवडून येणार्‍या लोकनेत्यांच्या विरोधात कारस्थाने करण्यात आली. ज्यांनी दगाबाजी केली, त्यांच्या मांडीला मांडी लावून बसणार नाही. अडीच वर्ष तोंड धरून बुक्क्यांचा मार सहन करत आम्ही राष्ट्रवादीच्या मांडीला मांडी लावून बसलोे. मात्र, सहनशक्ती संपल्याने महाविकास आघाडी सरकारमधून मंत्री असतानाही बाहेर पडलो, अशा शब्दात मंत्री शंभूराज देसाई यांनी पाटणकरांसह राष्ट्रवादी काँग्रेसवर जोरदार टीका केली.

Back to top button