सातारा : ‘टीबी’साठी मेडल मिळाले… ‘कोरोना’ने उपचार बिघडवले

सातारा : ‘टीबी’साठी मेडल मिळाले… ‘कोरोना’ने उपचार बिघडवले
Published on
Updated on

सातारा; विठ्ठल हेंद्रे :  सातारा जिल्ह्यात क्षयरोगाचे (टीबी) समूळ उच्चाटन करण्यासाठी क्षयरोग विभाग सतर्क असून जिल्ह्यात 'टीबी'चे प्रमाण कमी झाल्याने केंद्र सरकारच्या आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयानेही याची दखल घेतली. 'टीबी फ्री इंडिया' योजने अंतर्गत भारत देशातून सातारा जिल्ह्याला ब्रॉझ (कांस्य) पदक देऊन गौरवण्यात आले आहे. 2021 साली हा पुरस्कार दिला जात असताना दुसरीकडे मात्र कोरोना संसर्गाने त्याचवेळी आक्रमण केले आणि सातार्‍यासह सर्वच रुग्णांच्या उपचारांचे आरोग्य बिघडवले. दरम्यान, एचआयव्ही प्रमाणे 'टीबी' विभागालाही अधिक मूलभूत सुविधा मिळण्याची गरज निर्माण झाली आहे.

कोरोना संसर्गाचा कालावधी संपूर्ण जगासाठी परीक्षेचा काळ होता. या कालावधीमध्ये जे पूर्व रोगाने ग्रासलेले रुग्ण आहेत त्यांना अधिक त्रासाला सामारे जावे लागले. कारण कोरोना कालावधीत महाराष्ट्रात जिल्हाबंदीसह कडक निर्बंध होते. यामुळे सातारच्या 'टीबी' विभागावर देखील त्याच्या आपोआप मर्यादा आल्या. टप्प्याटप्प्याने कोरोना संसर्ग हलत नसल्याचे पाहून मात्र सातारच्या 'टीबी' विभागाने रुग्णांवर उपचार सुरू ठेवणे, त्यांना औषधे पुरवणे, आरोग्य सेवक, आशांमार्फत औषधे पोहचवणे अशी आदर्शवत यंत्रणा राबवली. याचवेळी केंद्र सरकारच्या 'टीबी फ्री इंडिया' योजने अंतर्गत ब्रॉझ पदक जाहीर केले. ऐन कोरोना कालावधीत हा यामुळे 'टीबी' विभागाच्या कामकाजाला अधिक महत्त्व प्राप्त झाले.

कोरोना संसर्गावेळी सुरुवातीला बराच कालावधी प्रवासाला बंदी असताना औषध घेण्यासाठी येणार्‍या 'टीबी' रुग्णांना अडचण होवू नये, यासाठी डॉक्टर, लॅब टेक्निशियन, फार्मासिस्ट, समूपदेशक पोलिसांशी स्वत: बोलत होते. तसेच येताना सोबत चार्ट व संबंधित कागदपत्रे जवळ बाळगण्यास सांगत होते. पाटण, जावलीसारख्या दुर्गम भागात बहुतांशी ठिकाणी औषध पोहोचवण्याची कार्यपध्दती अवलंबण्यात आली. कोरोना वार्डप्रमाणेच टीबी रुग्णांसाठी स्वतंत्र वॉर्ड करण्यात आले होते, अशी माहिती जिल्हा क्षयरोग विभागातील औषध निर्माण अधिकारी सुधाकर नेमाणे यांनी दिली.

कोरोनात 'टीबी' विभागाची पाटीलकी…

कोरोना संसर्ग मार्च 2020 मध्ये सातार्‍यात दाखल झाल्यानंतर संपूर्ण आरोग्य विभाग अलर्ट होता. मात्र नेमके काय करायचे, सूचनांचा होणारा भडिमार, बैठकांचा पाऊस यामुळे सर्वत्र गोंधळ होता. अशातच सातारच्या क्षयरोग विभागाला पूर्णवेळ अधिकारीच नव्हता. डॉ. अविनाश पाटील हे खंडाळा आरोग्य अधिकारी असताना त्यांच्याकडे जिल्हा क्षयरोग अधिकारी पदाचाही तात्पुरता कार्यभार सोपवण्यात आला. दोन्ही जबाबदार्‍या पेलत असताना त्यांनी कामकाजाचे नियोजन केले. मुंबई हे 'टीबी' चे आगार असून कोरोनात जे रुग्ण जिल्ह्यात परतले त्यांनाही सातार्‍यातून औषध पुरवण्याची महत्त्वपूर्ण तजवीज केली. मूळ जिल्ह्यातील अ‍ॅक्टिव्ह रुग्ण व नव्याने कोरोनामुळे गावी आलेले रुग्ण यांच्यासाठी औषधांचा साठा वाढवण्यात आला होता. अशा प्रकारे ऐन कोरोनात दोन चार्ज असतानाही प्रभावीपणे यंत्रणा राबवल्याने पाटीलकीचे कौतुक झाले.

25 टक्क्यांपर्यंत प्रमाण घटले.. गोल्ड अभी बाकी हैं…

केंद्र शासनाच्या आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाने सातारा जिल्ह्यात टीबी रुग्णांमध्ये 20.39 टक्क्यांपयर्र्त घट झाल्याने ब्राँझ पदक देवून सन्मानित केले. या तपासणीसाठी केंद्राचे पथक जिल्ह्यात 15 दिवस तळ ठोकून होते. टीबी झालेल्या रुग्णांची प्रत्यक्ष भेट घेणे, औषधांचा साठा व त्याचे रेकॉर्ड या सर्व बाबी तपासण्यात आल्या. यातून सातारा जिल्ह्यातील टीबीचे प्रमाण घटल्यावर शिक्कामोर्तब झाले. दरम्यान, केेंद्र शासन राबवत असलेल्या या योजनेत गोल्ड, सिल्व्हर व ब्राँझ पदकांचा समावेश होता. यामुळे सातारा जिल्हा क्षयरोग विभाग आता जिल्ह्यातील टीबीचे प्रमाण 80 टक्क्यांपर्यंत कमी करण्यासाठी प्रयत्न करत आहे. येत्या काळात गोल्ड मेडल मिळवण्यासाठी प्रयत्नशील असून क्षयरोग्यांनी, त्यांच्या कुटुंबीयांनी सहकार्य करण्याचे आवाहन डॉ. भारती जाधव यांनी केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news