आंबेनळी घाट चार दिवसांत होणार सुरु - पुढारी

आंबेनळी घाट चार दिवसांत होणार सुरु

प्रतापगड : पुढारी वृत्तसेवा  जुलै महिन्यातील अतिवृष्टीमुळे बंद पडलेली आंबेनळी घाटातील वाहतूक तीन – चार दिवसांत सुरु होणार आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने त्यासाठी कंबर कसली असून घाटातील रस्ता दुरुस्तीचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. येत्या चार दिवसांत महाबळेश्‍वर-पोलादपूर मार्गावरील वाहतूक पूर्ववत होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

जुलै महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे आंबेनळी घाटातील रस्ता तुटला होता. अनेक ठिकाणी मोठ मोठ्या दरडी कोसळल्या होत्या. डोंगरातून वाहणारा पाण्याचा प्रवाह दरडींमुळे घाटरस्त्यावरुनच वाहत होता. त्यामुळे पूर्ण दरडींचा मलबा रस्त्यावर पसरला होता. मोठ मोठे दगड रस्त्यावर आलेच होते. शिवाय काही ठिकाणी रस्ताही खचून मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. या संकटामुळे गेली दीड महिना ही घाट वाहतूक बंद आहे. ही वाहतूक सुरू करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने घाट रस्ता दुरूस्तीचे काम हाती घेतले आहे. प्रतापगड परिसरातील ग्रामस्थांनीही घाट रस्ता तत्काळ दुरुस्त करण्याची मागणी केली होती. लोकप्रतिनिधींनी भेटी देवून पाहणी करुन संबंधित विभागाला सूचना दिल्या होत्या.

मुसळधार पावसात अतिशय प्रतिकूल परिस्थितीत हे काम सुरू करून केवळ दीड महिन्यात रस्ता दुरूस्तीचे काम पूर्णत्वाला आणले आहे. येत्या चार दिवसात या मार्गावरील वाहतूक पूर्ववत होणार आहे.

या मार्गावरील वाहतूक सुरू होताच किल्ले प्रतापगडाच्या पायथ्याला असलेली 22 गावेही आता महाबळेश्वर तालुक्याशी पुन्हा जोडली जाणार आहेत. आंबेनळी घाटातून वाहतूक सुरू होताच किल्ले प्रतापगडावरील पर्यटन सुरू होणार आहे. शिवाय कोकणमार्गे महाबळेश्‍वरला येणारे मुंबईकर पर्यटक या घाट रस्त्यावरुन ये-जा करु शकणार आहेत. त्यामुळे पर्यटनावर अवलंबून असलेल्या अनेक कुटूंबांची उपासमार आता थांबणार आहे. शेकडो स्थानिकांचा रोजगार सुरू होण्यास मदत होणार आहे.

सातारा जिल्ह्यातील अनेक चाकरमानी यांना उत्सवासाठी कोकणात जाता येणार आहे. तसेच पुणे आणि नाशिक भागातील लोकांनाही या मार्गे कोकणात जाणे सोयीचे होणार आहे. वाई येथून अंबेनळी घाट मार्गे कोकणात होणारी भाजीपाला वाहतूक पूर्ववत सुरु होणार आहे.

Back to top button