
सातारा; पुढारी वृत्तसेवा : 'गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया, पुढच्या वर्षी लवकर या' अशा जयघोषात डॉल्बीच्या दणदणाटात, गुलाल, फुलांची उधळण करत, फटाक्यांच्या आतषबाजीत, पारंपरिक ढोल-ताशांच्या निनादात जिल्ह्यात सार्वजनिक व घरगुती बाप्पांना जलधारांच्या अभिषेकात निरोप देण्यात आला. सातारा शहरात तब्बल 19 तास सुरू असलेल्या मिरवणुकीची सांगता शनिवारी सकाळी 7.30 वाजता झाली. सातारा जिल्ह्यातील 3 हजार 847 सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या मूर्तींचे विसर्जन झाले. दरम्यान, बंदी असतानाही सातार्यात डॉल्बीचा दणदणाट झालाच.
कोरोनानंतर होणार्या यंदाच्या मुख्य गणेश विसर्जन मिरवणुकीचे युवा वर्गाला मोठे अप्रूप होते. बहुतांश मंडळांनी डॉल्बी व लेसर शो आणल्याने युवा वर्गाला जोश आला होता. यामध्ये युवक व महिला वर्गाचा मोठा उत्साह दिसून आला. डॉल्बीच्या दणदणाटामध्ये आणि पावसाच्या धारांमध्ये चिंब होऊन बेधुंदपणे युवा वर्ग नाचताना दिसत होता. तसेच झांजपथकांचा निनाद, नाशिकचा बाजा, पान 8 वर
ढोल ताशांचा गजर, फटाक्यांची आतषबाजी, डोळे दिपवणारा लेझर शो, मर्दानी खेळ, धनगरी नृत्य आकर्षणाचे केंद्रबिंदू होते.
जिल्ह्याच्या सर्वच भागामध्ये किरकोळ वादावादीचे प्रकार वगळता शांततेत मिरवणूक पार पडली. सातार्यातील मुख्य विसर्जन मिरवणूक दुपारी 4 वाजता सुरु झाली. यावेळी खा. उदयनराजे भोसले, मुख्याधिकारी अभिजीत बापट, प्रांताधिकारी मिनाज मुल्ला, तहसीलदार राजेश जाधव यांच्यासह पालिकेचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. आकर्षक फुलांनी सजवलेल्या पालखीत नगरपालिकेची गणेशमूर्ती ठेवण्यात आली होती. मोती चौकात विविध सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे मिरवणुकीत सामील झाली.
शहरातील महागणपती सम्राट, पंचमुखी गणेश मंदिर ट्रस्ट, व्यापारी, छ. प्रतापसिंह मंडळ, यासह विविध गणेशोत्सव मंडळाच्या मिरवणुका सकाळीच सुरू झाल्या होत्या. या मंडळाच्या गणेश मूर्तींसमोर रांगोळीचा सडा टाकण्यात येत होता.मिरवणुकीत शहरासह उपनगरातील विविध मंडळे सहभागी झाली होती. याचदरम्यान मुसळधार पावसाला सुरूवात झाली. त्यामुळे गणेश भक्तांची, मंडळांच्या कार्यकर्त्यांची एकच तारांबळ उडाली. विसर्जन मिरवणुकीदरम्यान सुरूवातीला गणेशभक्तांची गर्दीही नेहमीपेक्षा कमी प्रमाणात दिसत होती. मात्र, सायंकाळी 7 नंतर मोठ्या प्रमाणात शहरातील प्रमुख मार्गावर गणेशभक्तांचा जनसागर लोटला.पावसाच्या धारा कमी झाल्यानंतर मिरवणुकीला आणखी रंगत आली. हलक्या सरी अंगावर घेत डॉल्बीच्या दणदणाटामध्ये युवा वर्ग आणि महिलांनी ताल धरला होता. त्यामुळे भर पावसातही अनेकांनी मिरवणुकीचा आनंद लुटला. यावर्षी पहिल्यांदाच महिला व युवती मोठ्या प्रमाणात विविध मंडळांच्या मिरवणुकीत सहभागी झाल्या होत्या.
विसर्जन मिरवणुकीत गुलालाची उधळण करण्यात आल्याने मिरवणूक मार्ग गुलालाने माखला होता. रात्री उशिरा विद्युत रोषणाई केलेली मंडळे मिरवणुकीत दाखल झाली. त्यामुळे सारा परिसर उजळून निघाला होता. विसर्जन मिरवणुका पाहण्यासाठी रस्त्याच्या दुतर्फा गणेशभक्तांनी मोठी गर्दी केली होती. मोती चौकात गर्दी मोठ्या प्रमाणात झाल्याने काही काळ पोलिसांची दमछाक झाली. शहरातील काही मंडळांनी पारंपारिक वाद्यांचा वापर केला होता. सातारकरांचे श्रध्दास्थान असलेल्या शंकर पार्वती या मानाच्या गणपतीच्या मूर्तीचे शनिवारी सकाळी 7.30 वाजता बुधवार नाक्यावरील नगरपालिकेने तयार केलेल्या कृत्रिम तळ्यावर विसर्जन झाले. या मूर्तीच्या विसर्जनानेच मिरवणुकीची सांगता झाली. विसर्जन मार्गावर सीसीटिव्ही कॅमेर्याद्वारे पोलिसांनी करडी नजर ठेवली होती. मिरवणुकीवर जिल्हा पोलिस प्रमुख अजयुकमार बन्सल यांच्यासह वरिष्ठ पोलिस अधिकार्यांचेही लक्ष होते.
दरम्यान, फुटका तलाव, मंगळवार तळे, मोती तळ्यावर गणपती विसर्जनासाठी बंदी केली असली तरी त्या परिसरात नगरपालिकेच्यावतीने कृत्रिम हौद तयार करण्यात आले होते. त्या ठिकाणी भाविकांनी गणपतीचे विसर्जन केले. बुधवार नाक्यावरील महाकाय कृत्रिम तळे व राजवाडा येथील पोहण्याचा तलाव, गोडोली, हुतात्मा उद्यान, सदरबझार, संगम माहुली, वर्ये येथील वेण्णा नदीवर शहर परिसरातील नागरिकांची गर्दी झाली होती. तसेच ठिकठिकाणच्या विहिरी व तळ्यात विसर्जन करण्यात आले.
दुपारी 4 वाजता मिरवणुकीला सुरुवात झाली. त्याचवेळी बहुतांश मंडळांनी डॉल्बीचा दणदणाटही सुरू केला.
हा आवाज रात्री 12 पर्यंत कायम होता. मात्र, 12 चा ठोका पडल्यानंतर गणेश मंडळांनी स्वत:हून डॉल्बी व पारंपरिक वाद्ये बंद केली. त्यामुळे पोलिसांवरील ताण कमी झाला.
लाडक्या बाप्पांना सातार्यात थाटामाटात काढलेल्या विसर्जन मिरवणुकीद्वारे निरोप देण्यात आला. यावेळी विघ्नहर्त्याला पुढच्या वर्षी लवकर येण्याचे साकडेही घालण्यात आले.