
कोरेगाव ः पुढारी वृत्तसेवा पुढील पंधरा दिवसात जिल्ह्यातील शिवसेनेचे 90 टक्के पदाधिकारी मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत येतील.त्याचबरोबर शिवसेनेचे उर्वरित 15 आमदारही आमच्याकडे येणे बाकी आहेत. ते पुढील एक महिन्यातच मुख्यमंत्री ना. शिंदे यांच्यासोबत असतील. त्या आमदारांच्या बरोबर माझी चर्चा झाली असल्याचे राज्य उत्पादन शुल्क मंत्री ना. शंभूराज देसाई यांनी म्हटले आहे. रहिमतपूर येथे नागरी सत्कार व कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी शिवसेना शिंदे गटाचे जिल्हा संपर्कप्रमुख शरद कणसे, जिल्हाप्रमुख पुरुषोत्तम जाधव, जयवंत शेलार, माजी नगराध्यक्ष वासुदेव माने काका, अरुण माने, माजी उपनगराध्यक्ष सुखदेव माने, शिवसेना शहराध्यक्ष सागर माने यासह बहुसंख्य पदाधिकारी, युवा कार्यकर्ते व शिवसैनिक उपस्थित होते.
शिवसेनेचे उपनेते नितीन बानुगडे पाटील यांचा नामोल्लेख टाळून ना. शंभूराज देसाई म्हणाले, रहिमतपूर शहराला यापूर्वी राज्यस्तरीय संपर्कप्रमुख पद असताना कधीही शिवसेनेचा साधा मेळावाही झालेला नाही, मात्र आज खर्या अर्थाने शिवसेनेचे कोणतेही पद नसताना माजी नगराध्यक्ष वासुदेव माने काका यांनी शाखा उदघाटन करत शिवसेनेचा मेळावा घेतला. यातच त्यांचे खरे कौतुक आहे. रहिमतपूर नगर पालिकेवर भगवा फडकवण्यासाठी वासुदेव माने काका यांना सर्वतोपरी सहकार्य केले जाईल.
रहिमतपूरची वास्तव परिस्थिती व वातावरण मला चांगलेच माहिती आहे. येथे आरेला कारे करण्याची व अंगावर आला तर शिंगावर घेण्याची तयारी असणारी ही शिवसेना आहे. हे सगळ्यांनी लक्षात घ्यावे. वासुदेव माने काका यांच्या पाठीमागे मुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे यांची ताकद उभी करण्याचे आश्वासन त्यांनी यावेळी दिले. वासुदेव माने म्हणाले, केवळ राजकीय हेतूने रहिमतपूर नगरपालिकडे दुर्लक्ष केले गेले आहे. पाहिजे तितक्या प्रमाणात रहिमतपूर शहराचा सर्वांगीण विकास साध्य झाला नसल्याचे सांगितले. नगरपालिकेवर भगवा फडकवण्यासाठी ना. शंभूराज व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ताकद द्यावी. आभार भगवान माने यांनी मानले.