सातारा : डीजी लॉकरमुळे शैक्षणिक कारभार हायटेक; कर्मचार्‍यांना दैनंदिन वापराचा शिक्षण आयुक्‍तांचा आदेश | पुढारी

सातारा : डीजी लॉकरमुळे शैक्षणिक कारभार हायटेक; कर्मचार्‍यांना दैनंदिन वापराचा शिक्षण आयुक्‍तांचा आदेश

सातारा; पुढारी वृत्तसेवा : विविध माहिती तंत्रज्ञानाच्या जमान्याचा सध्या दैनंदिन वापरामध्ये सर्वजण वापर करत आहेत. त्यासाठी सर्वच शाळांमधील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचार्‍यांना दैनंदिन वापरासाठी आता डीजी लॉकरचा वापर करावा लागणार आहे. त्याबाबतचा आदेश शिक्षण आयुक्त सुरज मांढरे यांनी काढला आहे. डीजी लॉकरमुळे शैक्षणिक कारभार आता हायटेक होणार आहे.

विविध प्रकारच्या तंत्रज्ञानाचा उपयोग दैनंदिन वापरामध्ये सर्वचजण करत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून केंद्र शासनाने तयार केलेल्या विविध अ‍ॅपपैकी डीजी लॉकर हे एक अ‍ॅप सर्वांसाठी आपली वैयक्‍तिक कागदपत्रे सुरक्षीत ठेवण्यासाठी व जेव्हा आवश्यकता असेल तेव्हा तत्काळ उपलब्ध होण्यासाठी डीजी लॉकर या अ‍ॅपचा उपयोग महत्त्वपूर्ण ठरणार आहे. डीजी लॉकरमध्ये डाऊनलोड केलेली व अपलोड केलेली कागदपत्रे डिजिटल स्वरुपात असल्याने ती नेहमी आपल्या सोबतच असणार आहेत.

आवश्यकतेनुसार याचा वापर करता येणार आहे. या डीजी लॉकरमध्ये शासनाकडून ऑनलाईन सेवा उपलब्ध होत असलेली कागदपत्रे डाऊनलोड करून आपल्या डीजी लॉकर अ‍ॅप खात्यामध्ये सेव्ह करण्याची सोय आहे. या अ‍ॅपमध्ये 1 जी. बी. क्षमतेपर्यंत डाटा स्टोअर करता येतो तसेच डाऊनलोड केलेली कागदपत्रे ही मूळ कागदपत्रा समान असणार आहेत. या प्रमाणपत्रांची मूळ प्रत सोबत बाळगण्याची देखील आवश्यकता असणार नाही, कारण या ऑनलाईन डाऊनलोड केलेल्या कागदपत्रास केंद्र शासनाच्या माहिती तंत्रज्ञान कायदा 2000 मधील तरतुदीनुसार मूळ कागदपत्रांचा दर्जा प्राप्त आहे. पॅनकार्ड, वाहन चालवण्याचा परवाना, वाहन नोंदणी प्रमाणपत्र, कोव्हिड लस प्रमाणपत्र व विविध शैक्षणिक प्रमाणपत्रे आदी कागदपत्रांचा समावेश या डीजी लॉकरमध्ये करावा. उपलब्ध असलेल्या ऑनलाईन प्रमाणपत्रांशिवाय आपणास आवश्यक असणारी अन्य कागदपत्रे, विविध प्रशिक्षणाची प्रमाणपत्रे, प्रशस्तिपत्र, वेतन प्रमाणपत्र, शैक्षणिक कागदपत्रे ही देखील डीजी लॉकरमध्ये विविध फोल्डरमध्ये अपलोड करण्याची सुविधा देण्यात आली आहे. सध्या 1 जी. बी. पर्यंत डाटा स्टोअरेज करण्याची तरतूद आहे. ही कागदपत्रे आपण आवश्यकता असेल तेव्हा अ‍ॅपमधून डाऊनलोड करून किंवा खुले करुन योग्य त्या वेळी याचा सहज सुलभ वापर करता येणार आहे. डीजी लॉकर अ‍ॅप पूर्णपणे मोफत असून दैनंदिन वापरात महत्वाची भूमिका निभावणार असल्याने आपल्या अधिनस्त सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचार्‍यांना त्यांच्या नियमीत वापरातील मोबाईल अ‍ॅपमध्ये डाऊनलोड व इन्स्टॉल करुन वापराबाबत सूचना शिक्षण आयुक्त कार्यालयामार्फत देण्यात आल्या आहेत. त्यामुळे शैक्षणिक कारभार आता हायटेक होणार आहे.

Back to top button