कराड : पोलिसांच्या कारवायांनी गुन्हेगार धास्तावले | पुढारी

कराड : पोलिसांच्या कारवायांनी गुन्हेगार धास्तावले

कराड; अमोल चव्हाण :  रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगारांवर वचक ठेवण्यासाठी तसेच गणेश उत्सावासह दुर्गा उत्सव व येणार्‍या दसरा, दिवाळी सणांच्या पार्श्‍वभूमीवर पोलिसांनी गुन्हेगारांवर वचक ठेवण्यासाठी तडीपारीची कारवाई केली आहे. सण-उत्सवांमध्ये कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण होऊ नये म्हणून पोलिसांचे प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळे पोलिसांच्या कारवायांनी गुन्हेगारांमध्ये खळबळ उडाली असून ते चांगले धास्तावल्याचे दिसून येत आहे.

कराड शहर पोलिसांनी वरिष्ठांच्या आदेशानुसार कायदेशीर कारवायांबरोबरच गुन्हेगारांवर तडीपारीच्या कारवायांचा धडाकाच लावला आहे. त्यामुळे बहुतांशीवेळा सराईत गुन्हेगार आपल्या हद्दीबाहेर राहिले असल्याने गुन्हेगारी घटनांना आळा बसल्याचे दिसून येत आहे. यामध्ये संवेदनशील गावांवर नजर ठेवून पोलिसांनी तेथील गुन्हेगारांवर कारवाई केल्या आहेत. पोलिसांनी आतापर्यंत सराईत गुन्हेगारांबरोबरच गुन्हेगारी टोळ्यांवर तडीपारीच्या कारवाया केल्या आहेत.

कराड उपविभागात कराड शहर, कराड तालुका, उंब्रज व तळबीड पोलिस ठाण्यांकडून कार्यक्षेत्रात सण-उत्सव, सभा-समारंभ आदींच्या काळात तसेच अदखलपात्र गुन्ह्यानंतर प्रतिबंधक कारवाया केल्या जातात. तसेच होऊ घातलेल्या कराड नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर यंदाचा गणेशोत्सव व दुर्गा उत्सव तसेच दसरा व दिवाळीचे सण मोठ्या उत्साहात साजरे होतील. त्यातही कोरोनाचे सर्व निर्बंध शासनाने उठविल्याने यंदा गणेश उत्सवाला उधाण आले आहे. त्यामुळे वर्चस्व निर्माण करण्यासाठी अनेक गुन्हेगार व गुन्हेगारी टोळ्या पुन्हा सक्रिय होण्याची शक्यता नाकारता येत नाही. हेच ओळखून पोलिसांनी गुन्हेगारी रोखण्यासाठी तडीपारीच्या कारवाया सुरू केल्या आहेत.

कोरोनाची भीती कमी झाल्यानंतर गत काही दिवसांपासून विविध घटना-घडामोडी घडल्या. मोठ्या उत्साहात सभा, समारंभ, मिरवणुका निघू लागल्या आहेत. जाहीर कार्यक्रमांना मोठी गर्दी होऊ लागली. त्यामुळे अनेकवेळा तणावाचे वातावरण निर्माण झाले असतानाही पोलिसांनी केलेले प्रयत्नामुळे शांतता राहिल्याचे दिसून येते. त्यामुळे कराड उपविभागात कोठेही कायदा सुव्यवस्थेचा गंभीर प्रश्‍न निर्माण झाला नाही.

एकूणच पोलिसांच्या प्रयत्नामुळे कराडला गुन्हेगारीचे प्रमाण घटले असून पोलिसांनी विविध कारणांनी गुन्हेगारांच्या मुसक्या आवळल्या आहेत. सामाजिक शांतता राखण्यासाठी पोलिसांचा हाच फंडा यापुढेही सुरू राहिल्यास भविष्यात होणार्‍या कराड नगरपालिकेच्या निवडणुका शांततेत पार पडण्यास मदत होईल. पोलिस कोणत्याही परिस्थितीत कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण होऊ देणार नाहीत.

Back to top button