
कराड: पुढारी वृत्तसेवा आपण भारत देशाचे आदर्श नागरिक आहोत. देश सेवा करण्यासाठी सर्वांनी सैन्यातच भरती व्हावे, असे काही नाही, तर ज्या क्षेत्रात काम करत आहोत तेथे देशाहितासाठी समर्पित भावनेने केलेले काम ही देशसेवाच आहे, असे मत परमवीर चक्र विजेते सुभेदार मेजर संजय कुमार यांनी व्यक्त केले. देशाच्या सर्व सीमा सुरक्षित आहेत,असेही त्यांनी यावेळी सांगितले.
बनवडी, ता. कराड येथील डॉ. दौलतराव आहेर इंजिनिअरिंग कॉलेजवर त्रिशक्ती क्लबच्या वतीने आजादी का अमृत महोत्सवानिमित्त आयोजित व्याख्यानानंतर संजय कुमार यांनी पत्रकारांशी संवाद साधला. मेजर संजय कुमार म्हणाले, देशाच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण होतो त्या- त्या वेळी भारतीय सैन्यांनी तेवढ्याच सामर्थ्याने प्रतिउत्तर दिले आहे. ज्या आपल्या सीमा आहेत, त्या सुरक्षित आहेत आणि पुढेही सुरक्षित राहतील. सिमेवरील जवानांचे एकच ध्येय आहे, देशाच्या सिमांचे संरक्षण करणे. आजपर्यंत आपण अनुभव घेतला आहे की सीमा ओलांडून ज्या- ज्या वेळी कोणी भारतात आला आहे, त्या वेळी त्याला जशास तसे उत्तर भरतीय सैनिकांनी दिले आहे.
1965, 1971, किंवा 1991 यावेळी किंवा यामध्ये झालेले अन्य काही हल्ले असोत यावेळी भारतीय सेना मागे हटलेली नाही. जीवाची बाजी लावून लढली आहे. ते म्हणाले अग्निपथमुळे युवकांना सैन्य भरतीसाठी संधी उपलब्ध होईल. कारगिर युध्दात आम्हाला स्वतःला सिध्द करण्याची संधी मिळाली. हे ऑपरेशन राबविताना खूप कठीण परिस्थिती होती. खायला अन्न, पाणी काही नव्हते, बर्फाळ प्रदेशामुळे ऑक्सिजनची लेवल कमी होती. पर्वत चढून जाऊन अॅटॅक करायचा होता, पण अत्यंत प्रतिकुल परिस्थितीत सैनिकांनी हे ऑपरेशन यशस्वी केले. या ऑपरेशनमध्ये गोळी लागून मी जखमी झालो होतो. ते पुढे म्हणाले, देश सेवेसाठी सर्वांनीच सेनेत दाखल व्हावे असे नाही, तर आपण ज्या ठिकाणी काम करत आहोत त्या ठिकाणी प्रामाणिकपणे सेवा केली पाहिजे. देशाचे हित लक्षात घेऊन केलेली सेवा ही देशसेवाच आहे.
केंद्र सरकारच्या अग्निपथ योजनेबाबत मेजर संजय कुमार म्हणाले, केंद्र सरकारने ही नवीन योजना आणली आहे. युवक यामध्ये भरती होतील. त्यांना प्रशिक्षण दिले जाईल. यानंतर ते सैन्यात भरती होतील. प्रत्येक प्रशिक्षण वर्गातून पंचवीस टक्के युवकांना सैन्यात सामावून घेण्यात येणार आहे. यानंतर याचे फायदे आपणाला दिसून येतील. पहिल्याच वेळी अशा पध्दतीने भरती प्रक्रिया राबविली जात आहे. यातून चांगले आउटपूट मिळतील, असा विश्वास सुभेदार मेजर संजय कुमार यांनी व्यक्त केला.