
कराड ः पुढारी वृत्तसेवा मराठी भाषेला प्रमुख अभिजात भाषेचा दर्जा मिळावा, यासाठी खासदार श्रीनिवास पाटील यांनी संसदेत मागणी केली होती. या मागणीनंतर सांस्कृतिक पर्यटन मंत्री किशन रेड्डी यांनी हा प्रस्ताव केंद्र सरकारच्या विचाराधीन असल्याची ग्वाही दिली असल्याची माहिती खासदार श्रीनिवास पाटील यांच्याकडून देण्यात आली आहे.
खासदार श्रीनिवास पाटील यांनी संसदेत केलेल्या मागणीत मराठी ही भारतातील प्रमुख भाषेपैकी एक आहे. महाराष्ट्र, गोवा राज्याची राजभाषा आणि पश्चिम भारताची सह मातृभाषा आहे. मातृभाषेच्य संख्येच्या आधारावर मराठी ही जागतिक पातळीवरील तिसर्या क्रमाकांची भाषा आहे. मराठी ही भारतासह मॉरिशस आणि इस्त्राईलमध्येही मराठी मूळ लोकांकडून बोलली जाते. भारतात मराठी बोलणार्यांची संख्या हिंदी आणि बंगाली भाषेनंतर तिसर्या क्रंमाकाची आहे. मराठी भाषा आधुनिक भारतीय भाषेच्या प्राचीन साहित्यात समाविष्ट असून ती सुमारे 600 वर्षापासूनची आहे. मराठी साहित्यही बाराव्या शतकापासून उपलब्ध आहे.
म्हैसूर प्रदेशाच्या श्रवणबेळगोळमधील गोमटेश्वराच्या मूर्तीखाली श्री चामुंड राजे करवियले, गंगराजे सुत्ताले करविलये ही ओळ मराठी भाषेची सर्वप्रथम ज्ञात ओळ आहे. त्या शके 905 आणि इसवी सन 983 मध्ये लिहिल्याची माहिती आहे. त्यामुळे मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळणे आवश्यक असल्याचे खासदार श्रीनिवास पाटील यांनी सांगितले. त्यासाठी आवश्यक ते दस्तऐवज महाराष्ट्र सरकारकडून अभिजात भाषा देण्यासाठी नेमलेल्या समितीकडे दिले आहेत. या विषयावर सांस्कृतिक पर्यटन मंत्र्यांनी सकारात्मक माहिती दिल्याने मराठी भाषेला अभिजात भाषेचा दजार्र् मिळण्याची आशा पल्लवीत झाली आहे.