
प्रतापगड : पुढारी वृत्तसेवा सातारा जिल्ह्यातील किल्ले प्रतापगडाच्या पायथ्याशी अफझलखान आणि सय्यद बंडा यांच्या थडग्याशेजारी वनविभागाच्या जागेत झालेले अतिक्रमण पाडण्यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने दिलेली स्थगिती उठवण्यासाठी नामवंत वकिलांची नियुक्ती करावी, अशी मागणी माजी आमदार नितीन शिंदे यांनी मुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे. याप्रकरणी मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली वरिष्ठ अधिकार्यांची बैठक आयोजित करावी, असेही निवेदनात म्हटले आहे.
यावेळी झालेल्या चर्चेनंतर मुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे यांनी संबंधित विभागाची तातडीने बैठक आयोजित करण्याचे आदेश सचिवांना दिले आहेत. अफझलखान व सय्यद बंडा यांच्या कबरींच्या उदात्तीकरणाविरोधात आमचा गेले 20 वर्षे विधिमंडळ व शासन स्तरावर संघर्ष सुरु आहे. यात आम्हाला काही प्रमाणात यश देखील आले आहे. पण, अफझलखान व सय्यद बंडाच्या कबरीशेजारील जागेत झालेले बेकायदा बांधकाम व अतिक्रमण अद्याप हटवले गेलेले नाही. हे अतिक्रमण हटवण्याच्या उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाला अफझलखानाच्या अनुयायांनी सर्वोच्च न्यायालयात जावून स्थगिती मिळवली आहे.
ही स्थगिती उठवण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात सरकार आणि शिवभक्तांची बाजू मांडण्यासाठी नामवंत वकिलांची नियुक्ती सरकारने करावी, अशी मागणी नितीन शिंदे यांनी केली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याप्रकरणी वरिष्ठ शासकीय अधिकार्यांची बैठक आयोजित करण्याचे आदेश सचिवांना दिले आहेत. लवकरच तसा आदेश होईल, असेही शिंदे यांनी सांगितले. यावेळी आदित्य पटवर्धन, गजानन मोरे उपस्थित होते. याविषयीचे निवेदन वनमंत्री ना. सुधीर मुनगंटीवार यांनाही देण्यात आले आहे.