सातारा : निर्बंधमुक्त गणेशोत्सवामुळे मंडळे जोशात; हटके सजावटीवर राहणार भर | पुढारी

सातारा : निर्बंधमुक्त गणेशोत्सवामुळे मंडळे जोशात; हटके सजावटीवर राहणार भर

सातारा; पुढारी वृत्तसेवा : कोरोनानंतर तब्बल दोन वर्षांनी गणेशोत्सवावरील निर्बंध उठले आहेत. त्यामुळे यंदाचा गणेशोत्सव जल्लोषात आणि उत्साहात साजरा होणार आहे. निर्बंधमुक्त गणेशोत्सवामुळे सार्वजनिक गणेश मंडळे जोशात आली असून उत्सवाची जयारी जोमात सुरु आहे. विविध कार्यक्रमांच्या आयोजनासह सर्वात चांगली व हटके सजावटीवर गणेश मंडळांकडून भर दिला जात आहे. गणेशोत्सावाच्या पार्श्वभूमीवर बाजारपेठेत आर्थिक उलाढालही वाढली आहे.

गणेशोत्सव म्हणजे उत्साह आणि आनंदाचे पर्व असते. वर्षातून एकदा येणार्‍या या उत्सवात 10 दिवस बाप्पांचे वास्तव्य भक्तांमध्ये असते. त्यामुळे गणेशोत्सवाचे विशेष अप्रुप भक्तांमध्ये असते. गणेश चतुर्थीला आगमन व अनंत चतुदर्शीला निरोप असा हा बाप्पाच उत्सव काळ असतो. या दहा दिवसात बाप्पांच्या भक्तीत काही कमी पडणार नाही, यासाठी गणेशभक्तांचा प्रयत्न असतो. मागील दोन वर्षे कोरोनामुळे सणसमारंभ साजरे करण्यावर शासनाने निर्बंध लावले होते. त्यामुळे गणेशोत्सवही साधेपणाने पार पडला. मात्र, या वर्षी सर्व निर्बंध हटले आहेत. त्यामुळे यंदा निर्बंधमुक्त गणेशोत्सव साजरा होत असल्याने गणेशभक्तांसह सार्वजनिक गणेश मंडळांमध्ये जल्लोषाचे वातावरण आहे.

मागील दोन वर्षांची उणीव यावर्षी भरुन काढण्यासाठी सार्वजनिक गणेश मंडळे कामाला लागली आहेत. आपल्या बाप्पाची सर्वांत चांगली व हटके सजावट करण्यावर भर दिला जात आहे. कार्यकर्ते तयारीत व्यस्त झाले आहेत. सजावटीसाठी पुणे, मुंबईसह मोठमोठ्या शहरातील बाजारपेठांमध्ये जावून नाविन्याचा शोध घेतला जात आहे. मनासारख्या सजावट साहित्य खरेदीसाठी सढळ हाताने खर्च केला जात असल्याने गेल्या काही दिवसांपासून बाजारपेठेत आर्थिक उलाढाल वाढली असून ही वाढ पुढील काही दिवस कायम राहणार आहे.

व्यावसायिकांनाही बाप्पा पावणार…

तब्बल दोन वर्षांनंतर सार्वजनिक गणेश मंडळांबरोबर घरगुती गणेशोत्सवही या वर्षी दणक्यात साजरा होणार आहे. बापांच्या स्वागतासाठी भरपूर खरेदी केली जात असल्याने बाजारपेठेतील अर्थचक्र वेगात फिरु लागले आहे. घरगुती व साधेपणाने सण समारंभ साजरे झाल्याने त्यावर अवलंबित सर्वच व्यावसायिकांना मंदीचा सामना करावा लागला होता. मात्र या वर्षी ती सर्व कसर भरुन निघणार असल्याने या सर्व व्यावसायिकांना बाप्पा पावणार असल्याचे वास्तव बाजारपेठेतील आढाव्यातून स्पष्ट होत आहे.

होवू दे खर्च…

कोरोना काळात गणेशोत्सव साधेपणाने साजरा झाला त्यामुळे वर्गणी काढणे, महाप्रसाद वाटप, महाआरती, मनोरंजनात्मक कार्यक़्रम, देखावे या सर्वांनाचा फाटा देण्यात आला होता. त्यामुळे यावर्षी गणेशभक्त सार्वनिक गणेश मंडळाचे कार्यकर्त्यांनी आर्थिक आराखडा आखला आहे. देखाव्यासह उत्सवकाळात सामाजिक उपक्रमांबरोबरच विविध स्पर्धा, बक्षीस वितरण, मनोरजनात्मक कार्यक्रमांच्या आयोजनाला प्राधान्य दिले जाणार आहे. काही सार्वजनिक गणेश मंडळांची महाप्रसाद, स्पर्धेतील विजेत्यांचे बक्षीस वितरण आदिंसाठी प्रायोजकांसह प्रमुख उपस्थितांची यादी तयार करण्याचे काम युध्दपातळीवर सुरु आहे.

Back to top button