सातारा : वीज चोरट्यांना महावितरणचा झटका

सातारा : पुढारी वृत्तसेवा वीज चोरी हा कायद्याने गुन्हा असून कोणी असे कृत्य करत असेल तर त्यांनी आताच काळजी घेणे गरजेचे आहे. वीज चोरट्यांविरोधात महावितरणने कारवाईचा बडगा उगारला असून तीन महिन्यात आकडे टाकून वीज चोरी करणार्‍या 399, विजेचा गैरवापर करणार्‍या 59, तर मीटरमध्ये छेडछाड करणार्‍या 46, अशा 504 वीज ग्राहकांना कारवाईचा झटका दिला आहे. संबंधितांकडून सुमारे 46 लाखांचा दंड वसूल करण्यात आला आहे.

पश्‍चिम महाराष्ट्रासह जिल्ह्यात वीज चोरीचे प्रमाण प्रचंड असल्याचा पुरावाच महावितरणाला मिळाला आहे. जिल्ह्यातील अनेक ठिकाणी अचानक तपासणी करण्यात आल्याने विजेचा अनधिकृत वापर उघडकीस आला. 1 एप्रिलपासून महावितरणने अनेक वीजचोर्‍या पकडल्या आहेत. एकूण 504 प्रकरणात 3 लाख 83 हजार 315 इतक्या युनिट विजेच्या चोरीपोटी तब्बल 46 लाख रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला आहे. सातारा जिल्ह्यासह पाच तालुक्यात एकाच वेळी शेकडो अभियंता व कर्मचार्‍यांनी विविध पथकांद्वारे वीज चोरी विरोधात कारवाई सुरु केली आहे. नियमाप्रमाणे दंड व वीजचोरीचे बिल न भरल्यास फौजदारी कारवाई करण्यात येणार आहे. वीज बिलांच्या थकबाकीमुळे खंडित झालेला वीजपुरवठा परस्पर जोडून घेत किंवा अन्य ठिकाणाहून वीज वापर करणार्‍या ग्राहकांविरुद्ध सुद्धा या मोहिमेत फौजदारी कारवाई करण्यात येत आहे. महावितरणच्या या कारवाईच्या झटक्याने वीज चोरांचे धाबे दणाणले आहेत.

विजेचा गैरवापर केल्यास कारवाई

वीज वापराचे प्रयोजन बदलणे म्हणजे घरगुती कनेक्शन असताना व्यावसायिक किंवा औद्योगिक कारणासाठी वापर करणे म्हणजे विजेचा गैरवापर करणे होय. असे करताना कोणी आढळले तर विद्युत कायदा 2003 नुसार संबंधित ग्राहकावर कारवाई केली जाते. जिल्ह्यात 1 हजार 430 ग्राहकांची तपासणी केली असता 59 ठिकाणी विजेचा गैरवापर आढळून आला. अशा ग्राहकांकडून 10 लाख 55 हजारांचा दंड वसूल करण्यात आला आहे.

कलम 138 अंतर्गत कारवाई

मीटरला छेडछाड करुन वीजचोरी करणार्‍या 46 ग्राहकांविरुद्ध कलम 138 व इतर कलमांनुसार दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. या ग्राहकांनी 1 लाख 3 हजार 781 युनिटची चोरी केली. त्यांना 12 लाख 39 हजारांचा दंड ठोठावण्यात आला आहे.

7 जणांवर फौजदारी दाखल

महावितरणने आकडे टाकून वीजचोरी करणार्‍या 399 जणांविरुद्ध विद्युत कायदा कलम 135 नुसार कारवाई केली आहे. या प्रकरणात 7 जणांविरुद्ध फौजदारी गुन्हा दाखल करण्यात आला. 399 ग्राहकांची 2 लाख 79 हजार 354 युनिट वीजचोरीपोटी 33 लाख 69 हजार रुपयांचा दंड आकारण्यात आला.

विजेचा गैरवापर करणे, आकडा टाकणे अथवा मीटरमध्ये छेडछाड करणे, हे गंभीर स्वरूपाचे गुन्हे आहेत. असे कृत्य करणार्‍यांवर दंडात्मक कारवाई बरोबरच गुन्हा देखील दाखल होऊ शकतो. याची ग्राहकांनी काळजी घ्यावी.
– गौतम गायकवाड,
अधीक्षक अभियंता महावितरण

Exit mobile version