वाढे चौकातील रस्ता बनलाय मृत्यूचा जबडा | पुढारी

वाढे चौकातील रस्ता बनलाय मृत्यूचा जबडा

खेड : पुढारी वृत्तसेवा सातारा शहराचे प्रवेशद्वार असलेल्या वाढे चौकातील उड्डाणपुलाखाली सेवा रस्त्यावर पडलेल्या महाकाय खड्ड्यामुळे हा रस्ता मृत्यूमार्ग बनला आहे. वाहतुकीसाठी धोकादायक स्थिती या ठिकाणी झाली असून खड्यांच्या साम्राज्यातून मार्ग काढताना वाहनचालकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. सध्या खड्डे मुजवण्याची तात्पुरती मलमपट्टी केली जात असली तरी काही दिवसातच पुन्हा हे खड्डे उखडून ‘येरे माझ्या मागल्या’ अशी अवस्था होत आहे.

सातारा – लोणंद मार्गावरील वाढे चौक सध्या मोठ्या प्रमाणावर विकसित होत आहे. त्यामुळे या मार्गावर रहदारी वाढत चालली आहे. येथील मुख्य रहदारीच्या मार्गावर उड्डाणपुलाखाली सेवा रस्त्यावर पडलेले महाकाय खड्डे अपघाताला निमंत्रण देणारे ठरले आहेत. खड्ड्यातून मार्ग काढताना वाहनचालकांना कसरत करावी लागत आहे. रस्त्यावर असणार्‍या खड्ड्यात वारंवार पाणी साचत असते. त्यामुळे खड्ड्याचा अंदाज येत नसल्याने गाडी जोरात आदळून अपघात होत असतात. त्यामुळे मान व पाठदुखीचे अनेकांना त्रास सुरू झाले आहेत. तर खड्डा चुकवण्याच्या नादात वाहनांच्या धडकाधडकीचे प्रकार घडत आहेत.

खड्ड्यात साचत असलेल्या पाण्यातून वाहन गेल्यास रस्त्यावरून पायी चालणार्‍या लोकांच्या अंगावर खड्ड्यातील पाणी उडते. त्यामुळे वादावादीचे प्रसंग घडत असतात. या रस्त्यावर पाणी निचर्‍याची कोणतीही व्यवस्था नसल्याने वारंवार पाणी साचून तळी निर्माण होत आहेत. त्यातच रस्त्यावर साचणारे पावसाचे व परिसरातील लोकवस्तीमधील पाण्यामुळे खड्डाचा विस्तार वाढत आहे. संबंधित विभागाकडून खड्डे मुजविण्याची तात्पुरती मलमपट्टी केली जात असून ती तकलादू ठरत असल्याचे यापूर्वीही अनेकदा स्पष्ट झाले आहे.

खड्डे मुजवण्याची तकलादू प्रक्रिया

वाढे चौकातील उड्डाणपुलाखाली खड्ड्याची स्थिती गंभीर होत असल्याने सध्या खडी टाकून खड्डे मुजवण्याची तकलादू प्रक्रिया सुरू झाली आहे. ही तात्पुरती मलमपट्टी किती शाश्वत आहे? खड्डे मुजवले तरी ते जास्त दिवस टिकत नाहीत. ही वस्तुस्थिती असून आतापर्यंत येथील खड्ड्याचे पॅचवर्क करण्यासाठी किती रुपये खर्च केले, हा संशोधन विषय बनला आहे. येथील चौक कायमस्वरूपी खड्डे मुक्त करण्यासाठी ठोस उपाययोजना राबवण्याची मागणी वाहनचालक व नागरिकांनी केली आहे.

Back to top button