सातारा : डॉल्बीवरून सातार्‍यात होणार ‘दणदणाट’ | पुढारी

सातारा : डॉल्बीवरून सातार्‍यात होणार ‘दणदणाट’

सातारा : पुढारी वृत्तसेवा डॉल्बीवरून सातार्‍यात पुन्हा ‘दणदणाट’ सुरू झाला आहे. खा. उदयनराजे भोसले यांनी शुक्रवारी डॉल्बी वाजलीच पाहिजे, अशी भूमिका घेतली. डॉल्बी का वाजू नये? असा जाहीर सवाल करून त्यांनी प्रशासनाकडे त्याचे उत्तर मागितले आहे. दरम्यान, काही दिवसांपूर्वी आ. शिवेंद्रराजे भोसले यांनीही डॉल्बी सुरू करण्याची मागणी केली होती. त्याचवेळी पोलिस प्रशासनाने मात्र डॉल्बीसाठी परवानगी नसल्याचे स्पष्ट केले. आजही डॉल्बीबंदीवर पोलिस ठाम असल्याने आता राजकीय नेते मंडळी व प्रशासन आमने-सामने येण्याची चिन्हे असून, डॉल्बीच्या विषयावरून सातार्‍यात पुन्हा ‘दणदणाट’ सुरू झाला आहे.

गणेशोत्सवाला काही दिवसांचा कालावधी उरला असतानाच आता सातार्‍यात डॉल्बीवरून रान तापले आहे. आ. शिवेंद्रराजे भोसले यांच्या पाठोपाठ आता खा. उदयनराजे भोसले यांनीही डॉल्बीचे समर्थन केले आहे. यासंदर्भात खा. उदयनराजे शुक्रवारी शासकीय विश्रामगृह येथे माध्यमांशी बोलताना म्हणाले, सातार्‍यात डॉल्बी सिस्टीम वाजलीच पाहिजे. पोलिसांनी ‘प्रशासनाला डॉल्बी का नको आहे’, याचे पहिल्यांदा आम्हाला उत्तर द्यावे. डॉल्बी व्यवसायिकांच्या कुटुंबियांचा प्रशासनाने एकदा तरी विचार केला पाहिजे. डॉल्बीवर बंदी घातल्याने त्यांना आर्थिक फटका बसत आहे. त्यांच्याकडे डॉल्बी म्हणून न पाहता त्यांचा व्यवसाय म्हणून बघा. त्यांचा उदरनिर्वाह त्याच्यावर चालत असून मग त्यांनी करायचे काय? कोणीतरी डॉल्बीमुळे आम्हाला त्रास होतो असा अर्ज देतात मात्र, घरगुती कार्यक्रमावेळी स्वतः लावता तेव्हा चालते, वाढदिवसाला व लग्नात चालते.

मग दहीहंडी, गणपती, दिवाळी यासह विविध सणाला का डॉल्बी नको?, का प्रदूषण कारणीभूत आहे का? एवढे मोठे कारखाने पाण्याचे प्रदूषण करतात, रोगराई पसरली आहे. मग त्यावर का कारवाई करत नाही. सर्व साखर कारखान्यांना टाळे ठोका अशा सूचना प्रदूषण मंडळाच्या अधिकार्‍यांना केल्या असल्याचे खा. उदयनराजे म्हणाले. ते पुढे म्हणाले, शहरात डॉल्बीला बंदी आणि इतर ठिकाणी डॉल्बी मात्र जोरजोरात वाजते, असा दुटप्पीपणा व्हायला नको. सातारा जिल्ह्यातील नव्हे तर महाराष्ट्रातील जिल्हा प्रशासनाने डॉल्बीला परवानगी का नाही, हे पत्र काढून सांगावं. प्रशासकीय अधिकार्‍यांनी प्रत्येक घटकाचा विचार करून निर्णय घेतले पाहिजेत. डॉल्बी वाजलीच पाहिजे, अशी माझी भूमिका आहे. दोन-तीन तासाने असं काय आभाळ कोसळणार आहे का? असा सवालही खा. उदयनराजे यांनी पोलिसांना केला आहे.

Back to top button