सातारा : जिल्ह्यातील 40 हजार विद्यार्थी विनाआधार | पुढारी

सातारा : जिल्ह्यातील 40 हजार विद्यार्थी विनाआधार

सातारा; पुढारी वृत्तसेवा : जिल्ह्यातील 4 लाख 22 हजार 166 विद्यार्थ्यांपैकी 3 लाख 81 हजार 843 विद्यार्थ्यांकडे आधारकार्ड आहेत. तर अद्यापही 40 हजार 323 विद्यार्थ्यांकडे आधारकार्ड नसल्याचे समोर आले आहे. मात्र काही विद्यार्थ्यांच्या आधारकार्डमध्ये त्रुटी आहेत तर हे सर्व आधारकार्ड 31 ऑगस्टपूर्वी अपडेट करण्याचे आदेश शिक्षण आयुक्तांनी शिक्षणाधिकारी व गटशिक्षणाधिकार्‍यांना दिले आहेत. त्यामुळे आधारकार्ड अपडेट करताना गुरुजींसह मुख्याध्यापकांची डोकेदुखी वाढणार आहे.

आधारकार्ड अपडेट असेल तर त्यावर संचमान्यता करण्यात येईल असे आदेश गतवर्षी होते. परंतू यातील प्रमुख अडचणी आणि समस्या दूर न होता पुन्हा यंदाच्या शैक्षणिक वर्षात आधार कार्ड अपडेट करण्याचे काम सुरु करण्यात आले आहे. याबाबत शिक्षण विभागाने आदेश जारी केला आहे. शिक्षण विभागाच्या पत्रानुसार जिल्ह्यातील पहिली ते बारावीपर्यंत सुमारे 4 लाख 22 हजार 166 विद्यार्थी असून त्यापैकी 3 लाख 81 हजार 843 विद्यार्थ्यांकडे आधार कार्ड आहे. त्यापैकी 33 हजार 224 विद्यार्थ्यांच्या आधारकार्डमध्ये त्रुटी आहेत तर 40 हजार 323 विद्यार्थी विना आधारकार्ड आहेत. आधार केंद्रावर सुरुवातीला माहिती भरताना नावात मराठी आणि इंग्रजी भाषा अद्याक्षर बदल, जन्मतारखेचे केवळ वर्ष, अडनाव, आई-वडिलांचे नाव आणि मूळ दाखल्यावरील नावे भिन्न असल्याचे आढळले आहे. शालेय शिक्षण विभागांतर्गत विद्यार्थ्यांसाठी लाभाच्या विविध उपाययोजना राबवल्या जातात. त्या पात्र विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी शिक्षण संचालनालयाने आधार क्रमांक अपडेट करण्याबाबत सूचना दिल्या आहेत. सर्व विद्यार्थ्यांचे आधार क्रमांक सरल प्रणालीत ऑनलाईन पध्दतीने अपडेट करण्याच्या सूचना शिक्षण आयुक्तांनी दिल्या आहेत. शिक्षणाधिकारी, गटशिक्षणाधिकारी, शिक्षण विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख, मुख्याध्यापकांनी ही सर्व प्रक्रिया 31 ऑगस्टपूर्वी पूर्ण करावी, असे आदेश दिले आहेत. त्यामुळे डोकेदुखी वाढली आहे.

अशी आहे तालुक्यांची आकडेवारी…

जावली 796, कराड 7 हजार 416, खंडाळा 3 हजार 39, खटाव 3 हजार 739, कोरेगाव 2 हजार 874, महाबळेश्‍वर 1 हजार 435, माण 4 हजार 155, पाटण 2 हजार 531, फलटण 4 हजार 253, सातारा 7 हजार 689, वाई 2 हजार 396 असे मिळून 40 हजार 323 विद्यार्थ्यांकडे अद्यापही आधारकार्ड नसल्याचे समोर आले आहे.

जिल्ह्यातील सर्व शाळांना विद्यार्थ्यांचे आधारकार्ड अपडेट करण्याच्या सूचना मुख्याध्यापकांना देण्यात आल्या आहेत. जिल्ह्यात सुमारे 90.45 टक्के विद्यार्थ्यांकडे आधार कार्ड आहे.
– धनजंय चोपडे, उपशिक्षणाधिकारी (प्राथमिक)

Back to top button