सातारा : कोरेगाव मतदारसंघातील रस्ते होणार टकाटक | पुढारी

सातारा : कोरेगाव मतदारसंघातील रस्ते होणार टकाटक

कोरेगाव; पुढारी वृत्तसेवा : कोरेगाव विधानसभा मतदारसंघातील कोरेगाव, खटाव व सातारा तालुक्यातील रस्त्यांची सुधारणा करण्यासाठी आणि नव्याने रस्ते तयार करण्यासाठी आ. महेश शिंदे यांनी केलेल्या मागणीवरुन मुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांनी पुरवणी अर्थसंकल्पामध्ये 50 कोटी रुपयांची तरतूद केली आहे. या निधीमुळे या तालुक्यांना जोडणार्‍या प्रमुख रस्त्यांची सुधारणा होणार असून, मतदारसंघाच्या विकासामध्ये तो मैलाचा दगड ठरणार असल्याचे आ. महेश शिंदे यांनी सांगितले.

आपण मुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली उपमुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पुरवणी अर्थसंकल्पामध्ये रस्त्यांची सुधारणा करण्यासाठी प्रस्ताव सादर केला होता. त्यास तत्वत: मान्यता देण्यात आली आहे. 50 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाल्याने आता मतदारसंघातील कोरेगाव, खटाव व सातारा तालुक्यांचा सर्वांगिण विकास साधता येणार आहे. त्याचबरोबर सर्वच रस्ते खड्डेमुक्त होतील, त्याचा फायदा नागरिकांसह वाहतूकदारांना होणार असल्याचेही आ. महेश शिंदे यांनी सांगितले.

खंडाळा-जयसिंगपूर-शिरोळ राज्यमार्गाच्या सातारारोड ते जळगाव या चार कि. मी. अंतराच्या सुधारणेसाठी 4 कोटी 60 लाख रुपये, कोरेगाव शहर ते डी. पी. भोसले कॉलेजदरम्यान चौपदरीकरण व सुधारणा करण्यासाठी 10 कोटी रुपये, जिहे-कठापूर -कोरेगाव-खेड (नांदगिरी)-सातारारोड-पळशी या प्रमुख जिल्हा मार्गाच्या कठापूर ते कोरेगाव दरम्यान रुंदीकरण व सुधारणा करण्यासाठी 10 कोटी रुपये तर राज्य मार्ग क्र. 140 ते कोरेगााव तालुका हद्दीपर्यंत या रस्त्याची सुधारणा करण्यासाठी 3 कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. भुईंज-शिवथर-पाडळी-जळगाव या प्रमुख जिल्हा मार्ग आणि ऊस वाहतुकीचा अत्यंत महत्वाचा रस्ता असल्याने त्याच्या शिवथर रेल्वे गेट ते भीमनगर फाटा या सव्वा दोन कि. मी. अंतराच्या सुधारणेसाठी 1 कोटी 20 लाख रुपये तर भीमनगर फाटा ते जळगाव दरम्यान रस्त्याच्या सुधारणेसाठी 4 कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. वडूथ-सातारारोड-अंबवडे सं. कोरेगाव-किन्हई या प्रमुख जिल्हा मार्गावर अंबवडे संमत कोरेगाव येथे पुलाचे बांधकाम आणि रस्त्याचा चढ कमी करण्यासाठी 1 कोटी 65 लाख रुपये, या रस्त्यावरच सातारारोड गावात पुलाचे बांधकाम करण्यासाठी 5 कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. मर्ढे ते राष्ट्रीय महामार्गापर्यंतच्या दोन कि. मी. रस्त्याची सुधारणा करण्यासाठी 1 कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. खटाव तालुक्यात प्रमुख जिल्हा मार्ग क्रमांक 10 ते धारपुडी-खटाव-जाखणगाव या प्रमुख जिल्हा मार्ग क्रमांक 97 येथे खटाव गावाजवळ येरळा नदीवर मोठ्या पुलाच्या बांधकामासाठी 7 कोटी 50 लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे तर धारपुडी येथे रस्त्याची सुधारणा करण्यासाठी 1 कोटी 25 लाख रुपये, खातगुण येथे राज्य मार्ग क्रमांक 146 ते राज्य मार्ग क्रमांक 141 ला जोडणार्‍या खातगुण ते कटगुण या रस्त्याची लहान पुलाच्या बांधकामासह सुधारणा करण्यासाठी 2 कोटी 80 लाख रुपये, प्रमुख जिल्हा मार्ग क्रमांक 38 ते जांब -जाखणगाव रस्त्याची सुधारणा करण्यासाठी 4 कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत.

कोरेगाव शहर होणार बिझनेस हब

कोरेगाव शहराचा वाढता विस्तार लक्षात घेऊन कोरेगाव ते कठापूर रस्ता, कोरेगाव ते रहिमतपूर रस्ता, कोरेगाव ते जळगाव रस्ता या रस्त्यांचा विकास करण्याचा महत्वपूर्ण निर्णय आ. महेश शिंदे यांनी घेतला आहे. पुरवणी अर्थसंकल्पामध्ये या तीन्ही रस्त्यांसाठी कोट्यवधी रुपयांची तरतूद झाली आहे. एकूणच कोरेगाव शहराची वाटचाल आता बिझनेस हबकडे सुरु आहे. कोरेगावकरांनी टाकलेला विश्वास सार्थ ठरवत प्रत्येक अधिवेशनात कोरेगावसाठी कोट्यवधी रुपयांचा निधी आणून त्यांनी शहरवासियांना अभिनव भेटच दिली आहे.

पाणंद रस्ते देखील चकाचक होणार

शेतकर्‍यांसह शेती व्यवसायासाठी अत्यंत महत्वाचे असलेले पाणंद रस्त्यांच्या दुरुस्तीची मोहीम आ. महेश शिंदे यांनी स्वखर्चाने हाती घेतली आहे. कोणत्याही गावातील शेतकर्‍याला आपल्या शेताच्या बांधापर्यंत सहजपणे जाता यावे, शेतीतील सर्व कामे करता यावीत, शेतीतील पिके सहजरित्या बाहेर काढता यावीत, यासाठी पाणंद रस्ते निर्मिती व दुरुस्ती मोहीम हाती घेण्यात आली आहे. कोरेगाव विधानसभा मतदारसंघात 480 कि. मी. अंतराचे पाणंद रस्ते स्वखर्चातून दुरुस्त करण्याचा निश्चय आ. महेश शिंदे यांनी केला आहे. त्यापैकी आजमितीस 170 कि. मी. अंतराचे काम पूर्ण झाले असून, सध्या अनेक रस्त्यांची कामे युध्दपातळीवर काम सुरु आहेत. ज्या गावातून शेतकरी मागणी करतात, तेथे तातडीने स्वखर्चाने यंत्रणा पाठवली जात आहे. एकूणच शेतकरी हितासाठी पाणंद रस्ते चकाचक करण्याची मोहीम यशस्वीतेकडे जात असल्याने शेतकर्‍यांमध्ये आणि ग्रामस्थांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

Back to top button