सातारा : जिल्ह्यातील धरणे 90 टक्क्यांवर; विसर्ग सुरूच | पुढारी

सातारा : जिल्ह्यातील धरणे 90 टक्क्यांवर; विसर्ग सुरूच

सातारा; पुढारी वृत्तसेवा : जिल्ह्यातील कोयना, धोम, धोम-बलकवडी, कण्हेर, उरमोडी, तारळी या धरणातील पाणीसाठा 90 टक्क्यांवर पोहोचला आहे. सर्वच धरणातून एकूण सुमारे 31 हजार 29 क्युसेक पाण्याचा विसर्ग नदीपात्रात करण्यात येत आहे. दरम्यान, जिल्ह्यात गुरुवारी पावसाची उघडझाप राहिली. श्रावणसरींमुळे अनेकदा नागरिकांची तारांबळ उडाली.

गेल्या काही दिवसांपासून बरसणार्‍या पावसाची गुरूवारी उघडझाप सुरू होती. धरण पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या रिपरिप पावसामुळे पाणीसाठा वाढू लागला आहे. त्यामुळे बहुतांश धरणे भरण्याच्या मार्गावर आहेत. कोयना धरणात आजची पाणी पातळी 657.53 मीटर असून उपयुक्त पाणी साठा 92.03 टी.एम.सी आहे. हे धरण 91.96 टक्के भरले असून धरणातून 21 हजार 576 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे.

धोम धरणात आजची पाणी पातळी 746.60 मीटर असून उपयुक्त पाणीसाठा 10.79 टी.एम.सी आहे. 92.30 टक्के पाणी असून धरणातून 1 हजार 375 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. धोम-बलकवडी धरणात आजची पाणी पातळी 811.75 मीटर असून उपयुक्त पाणीसाठा 3.62 टी. एम. सी आहे. 91.41 टक्के पाणी आहे. धरणातून 923 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे.

कण्हेर धरणातील एकूण पाणीसाठा हा 261.36 दलघमी इतका झाला असून सध्या धरण 91.38 टक्के भरले आहे. सध्या धरणात पाण्याची आवक ही प्रतितास 4000 क्यूसेक होत आहे.

उरमोडी धरणात आजची पाणी पातळी 694.97 मीटर असून उपयुक्त पाणी साठा 9.08 टी.एम.सी आहे. 94.09 टक्के पाणी असून धरणातून 3 हजार 123 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. तारळी धरणात आजची पाणी पातळी 708.40 मीटर असून उपयुक्त पाणीसाठा 5.28 टी. एम. सी आहे. 90.41 टक्के पाणी असून धरणातून 808 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. नागेवाडी 100 टक्के, मोरणा गुरेघर 70.46 टक्के, उत्‍तरमांड 68.52 टक्के, महू 80.47 टक्के, हातगेघर 46.69 टक्के, वांग मराठवाडी 73.68 अशी टक्केवारी आहे.

गुरुवारी दिवसभर सातारा शहर व परिसरात ऊन पावसाचा खेळ सुरू होता. पश्‍चिम भागातही पावसाचा जोर मंदावला आहे. पाऊस कमी झाल्याने नदी, नाले व ओढ्यातील पाण्याची पातळी कमी झाली आहे. तसेच नद्यांचा पूरही ओसरु लागला आहे. खरीप हंगामातील पिके चांगली असून शेतामध्ये भांगलणीसह किडनाशक औषधांची फवारणी सुरु आहे.

कण्हेरमधून तिसर्‍यांदा पाणी सोडले

कण्हेर; पुढारी वृत्तसेवा : कण्हेर धरणाचे चारही दरवाजे गुरुवारी सायं. 5 वाजता 0.20 मीटरने उचलून 2175 क्यूसेक पाण्याचा विसर्ग करण्यात आला. धरण पाणलोट क्षेत्राच्या पश्चिमेकडे असलेल्या महाबळेश्वर भागात दोन दिवसात सुमारे 174 मिमी इतका पाऊस झाला आहे. यामुळे धरणातील पाण्यामध्ये मोठी आवक होऊन पाणी पातळी ही 689.41 मीटर इतकी झाली. पाण्याची पातळी स्थिर ठेवण्यासाठी दोन दिवस बंद केलेले पाणी पुन्हा धरणातून तिसर्‍यांदा सोडण्यात आले आहे. सध्या धरणात 9.23 टीएमसी इतका समाधानकारक असा पाणीसाठा उपलब्ध आहे.

Back to top button