सातारा : ‘इथे जन्मती वीर जवान’! 'या' गावातील प्रत्येक घरातील एक तरी तरुण सैन्यात | पुढारी

सातारा : ‘इथे जन्मती वीर जवान’! 'या' गावातील प्रत्येक घरातील एक तरी तरुण सैन्यात

वेणेगाव-सातारा; सुहास काजळे : ‘इथे जन्मती वीर जवान’ याचे तंतोतंत उदाहरण म्हणजे सातारा तालुक्यातील अपशिंगे (मि.) हे गाव. या गावाने देशभक्‍तीचा अनोखा इतिहास रचला आहे. सैनिकाचा जिल्हा म्हणून महाराष्ट्राच्या नकाशावर सातारा जिल्ह्याची आगळीवेगळी ओळख आहे. याच जिल्ह्यातील सातारा तालुक्यातील अपशिंगे मि. या गावातील 46 जवानांनी पहिल्या महायुद्धात आपल्या देशासाठी आपल्या प्राणाची आहुती दिली.

  • असा आहे या गावचा लौकिक
  • प्रत्येक घरातील एक तरी तरुण सैन्यात
  • दुसर्‍या महायुद्धात
  • चार जवान शहीद
  • पाकिस्तानविरोधातही जवानांची बाजी
  • राज्य सरकारकडून गावच्या विकासासाठी विशेष धोरण

सैनिकी परंपरेची फ्रान्स देशाकडून दखल

पहिले महायुद्ध, दुसरे महायुद्ध, चीन, पाकिस्तानविरूद्धचे युध्द तसेच आझाद हिंद सेना असल्यापासून अपशिंगे मिलिटरी या गावाने जपलेल्या सैनिकी परंपरेची दखल फ्रान्स सरकारनेही घेतली आहे. फ्रान्स देशाने पहिल्या महायुद्धात येथील 46 जवान शहीद झाल्याने या गावचा सन्मान करण्याचा निर्णय घेतला आहे. फ्रान्स सरकारकडून या गावाचा सन्मानचिन्ह देवून गौरव केला जाणार आहे. तसेच शैक्षणिक मदतीच्या दृष्टीने भरीव योगदानही दिले जाणार आहे.

पहिल्या महायुद्धात अपशिंगेच्या 46 जवानांनी दिली प्राणांची आहुती…

अपशिंगे मिलिटरी हे सातार्‍याच्या दक्षिणेकडे 18 किलोमीटर अंतरावर सुमारे पाच हजार लोकसंख्या असलेले गाव वसलेले आहे. या गावाचे खास वैशिष्ट्य म्हणजे प्रत्येक कुटुंबातील किमान एक तरी युवक हिंदुस्तानी सैन्यामध्ये आपली सेवा देत आहेत. सैन्यामध्ये भरभरून योगदान दिल्यामुळे या गावाचे नामकरण अपशिंगे मिलिटरी असे केले आहे. जवळपास चारशे वर्षापूर्वी वसलेल्या या गावाने अनेक वीर पुत्र देशासाठी दिले आहेत. पहिल्या महायुद्धात 46 जवान शहीद झाल्याने ब्रिटिशांनी मिलिटरी अपशिंगे असे नामकरण करून या गावाला गौरवले. वीर पुत्रांच्या स्मरणार्थ ब्रिटिश सरकारने ‘कोनशिला’ही बसवली आहे. ही कोनशीला म्हणजे या गावातील गावकर्‍यांचे मानाचे प्रतिक आहे.

दुसर्‍या महायुद्धात येथील चार जवान शहीद झाले तर चीनच्या 1962 च्या युद्धात चार जवान शहीद झाले तर 1965, 1971 च्या पाकिस्तान विरोधातील युद्धात एक- एक जवान शहीद झाला.

भारतीय सैन्य दलातर्फे गावाला रशियन बनावटीचा रणगाडा भेट…

सैनिकी परंपरा जपत देश रक्षणासाठी योगदान देणार्‍या या सैनिकांच्या गावाला भारतीय सैन्याकडून नुकताच रशियन बनावटीचा रणगाडा भेट देण्यात आला आहे. यामुळे अपशिंगे गावच्या लौकिकात मानाचा तुरा रोवला गेला आहे.

येत्या काळात ’व्हिलेज वॉरियर्स अपशिंगे मिलिटरी’ या उपक्रमाअंतर्गत रशियन रणगाड्याच्या जवळ हवाई जहाज, लढाई ऑपरेशन करण्याची सर्व यंत्रसाम्रगी उभारण्याचा मानस येथील आजी- माजी सैनिक व येथील ग्रामस्थांनी बोलून दाखवला.

नव्याने सैन्यदलात सेवा करण्यासाठी युवा वर्गास एक उर्जा मिळण्यासाठी तसेच मुलांच्या ट्रेनिंगसाठी अभ्यास व इतर सुविधा देण्यासाठी येथील ग्रामस्थांनी एक आराखडा तयार केला आहे.

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त सोमवार दि. 15 ऑगस्ट रोजी या गावातील 75 आजी- माजी सैनिकांचा सन्मान मुंबईत षण्मुखानंद ललित कला आणि संगीत सभा सायन पूर्व मुंबई या संस्थेमार्फत केला जाणार आहे.

अमृतमहोत्सवानिमित्त विविध विधायक उपक्रमांचे आयोजन

या गावात ‘साहस’, ‘प्रहार’ आणि ‘विजय’ असे लिहलेली सैनिकांची प्रतिमा भिंतीवर चिकटवली आहे. सैनिकी परंपरा असणार्‍या या गावाचा सर्वांगीण विकास होण्याच्या द‍ृष्टीने राज्य शासनाने धोरणात्मक पाऊल उचलले आहे. याच धर्तीवर गावातील समस्यांचा निपटारा करून खर्‍या अर्थाने भारतीय स्वातंत्र्य दिनाचे अमृतमहोत्सवी वर्ष साजरे केले जात असल्याचे गावकर्‍यांनी सांगितले.

Back to top button