सातारा : रूईतून सख्खे बहीण-भाऊ बेपत्ता

लोणंद; पुढारी वृत्तसेवा : रूई (ता. खंडाळा) येथील आशिष प्रशांत राणे (वय 4) व ऐश्वर्या प्रशांत राणे (वय अडीच वर्षे) हे बहीण-भाऊ शनिवारी बेपत्ता झाले. याप्रकरणी लोणंद पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यात आली आहे. या मुलांच्या शोधासाठी महाबळेश्वर ट्रेकर्सची टीम रूईमध्ये दाखल झाली आहे.

रूई गावातील प्रशांत राणे यांची आशिष व ऐश्वर्या ही लहान मुले घराच्या बाजूला खेळत होती. दुपारी 12 वाजता त्यांना शेवटचे पाहण्यात आले. त्यानंतर ती दोघेही या परिसरात कुठेच आढळून आली नाही. सायंकाळी 5 वाजेपर्यंत त्यांची गावात व आजूबाजूला शोधाशोध करण्यात आली. मात्र, ती मिळून आली नाहीत. त्यामुळे याची माहिती लोणंद पोलिसांना देण्यात
आली.

याची माहिती मिळाल्यानंतर सपोनि विशाल वायकर, एपीआय गणेश माने, हवालदार अविनाश नलवडे, अविनाश शिंदे यांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी घटनास्थळी नातेवाईक व इतर शेजार्‍यांची चौकशी करून मुलांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. पोलिस व कुटूंबियांनी गावालगत असणार्‍या वीर धरण, कॅनॉल, विहिरी येथेही शोध घेतला पण ते मिळून आले नाही.

बेपत्ता झालेल्या आशिषने अंगात पांढरा हाफ शर्ट व पांढरी रंगाची पँट, ऐश्वर्याने अंगात गुलाबी रंगाचा फ्रॉक घातला आहे. ही लहान मुले घरा पासून100 मीटर अंतरावर खेळत असलेले दिसले होते. ते अंतर व नीरा उजवा कॅनॉलजवळ आहे. त्यामुळे या वर्णनाची मुले आढळून आल्यास पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. दोन लहान मुले बेपत्ता झाल्याने गावात खळबळ उडाली आहे.

Exit mobile version