बंडात दगाफटका झाला असता तर शहीद होण्याचा धोका होता : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे | पुढारी

बंडात दगाफटका झाला असता तर शहीद होण्याचा धोका होता : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

बामणोली (नीलेश शिंदे) : बंड करणे सोपे नव्हते. बंडात दगाफटका झाला असता तर शहीद होण्याचा धोका होता. मात्र, तापोळ्याची पद्मावती देवी, माझे ग्रामदैवत जननी देवी, उत्तेश्वर बाबा यांच्या आशीर्वादानेच मी सर्व गोष्टींमधून यशस्वी झालो व राज्याचा मुख्यमंत्री झालो, असा गौप्यस्फोट मुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे यांनी तापोळा येथे बोलताना केला. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘आगे बढो’ असा आशीर्वाद दिल्यामुळे महाराष्ट्राच्या विकासात काहीही कमी पडणार नसल्याचेही त्यांनी सांगितले.

मुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे त्यांचे मूळ गाव असलेल्या दरे तांब, ता. महाबळेश्वर येथे गुरुवारी रात्री आले. मायभूमीत मुख्यमंत्री प्रथमच येत असल्याने कोयना भाग 105 गाव समाज, तापोळा ग्रामस्थ व शिवसेना शिंदे समर्थक यांच्या वतीने तापोळा येथील पद्मावती मंदिरात त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. यावेळी खा. डॉ. श्रीकांत शिंदे, ठाण्याचे नगरसेवक प्रकाश शिंदे, शिवसेनेचे माजी जिल्हा प्रमुख पुरुषोत्तम जाधव, तापोळा सरपंच आनंद धनावडे, संजय मोरे, सचिन कदम, अजित सपकाळ, धोंडिबा धनावडे, ह.भ.प. बाळकृष्ण महाराज शिंदे आदी उपस्थित होते.

ना. एकनाथ शिंदे म्हणाले, ग्रामपंचायत सदस्यसुद्धा आपले सदस्यत्व सोडायला तयार नसतो. अशा परिस्थितीत माझ्यासोबत महाविकास आघाडी सरकारमधील 9 मंत्री यांच्यासह एकूण 50 आमदार आले. मंत्रीपद सोडून 9 जणांनी माझ्यावर विश्वास दाखवला. त्याचबरोबर सोबत आलेल्या सर्वच आमदार माझ्या पाठीशी राहिले. बंड करणे सोपे नव्हते. मात्र, मीसुद्धा संघर्षातून घडलो आहे. अनेक सामाजिक गुन्हे अंगावर घेतले. बंड फसले असते तर शहीद होण्याची वेळ आली असती. मात्र, या सगळ्या बाबींतून मी यशस्वीपणे बाहेर पडलो.

मुख्यमंत्रीपद स्वीकारल्यानंतर मी ज्यावेळी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटलो. त्यावेळी त्यांनी मला सांगितले की, आगे बढो, राज्य के विकास के लिये कुछ भी कम नहीं पडने देंगे, हम और केंद्र सरकार आपके साथ है। पंतप्रधानांच्या आशीर्वादामुळे आता महाराष्ट्राच्या विकासात आम्ही कुठेही कमी पडणार नसल्याची ग्वाही मुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे यांनी दिली.

शेतकरी बळीराजा हा आपला मायबाप आहे. राज्यातील शेतकर्‍यांच्या आत्महत्या थांबल्या पाहिजेत. त्यामुळे आम्ही पहिल्या कॅबिनेटमध्येच शेतकर्‍यांच्या हिताचे निर्णय घेतले. समुद्रामध्ये वाहून जाणारे पाणी दुष्काळी भागात वळवण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. अतिृष्टीमुळे शेतकर्‍यांचे जे नुकसान झाले आहे, त्याला एनडीआरएफच्या निकषाच्या दुप्पट नुकसान भरपाई देण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे.लिफ्ट एरिगेशनचे विजेचे दर एक रुपयाने कमी केले. शेतीपंपासाठी शेतकर्‍यासाठी पेट्रोल डिझेलच्या दरामध्ये देखील कपात केली. हे सरकार सर्वसामान्यांचे सरकार असल्याचे देखील त्यांनी सांगितले.

सातार्‍यात पर्यटनाला मोठा वाव आहे. सातार्‍याचा पश्चिम भाग पर्यटनाच्या दृष्टीने अतिशय महत्वाचा आहे. या भागाच्या विकासाच्या विचार सुरू असून लवकरच या बाबतीत आवश्यक ते निर्णय घेतले जातील, तसेच रस्त्यांचा दळणवळणाचा देखील प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावला जाईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे यांनी यावेळी दिली.

यावेळी तापोळा येथे खा. डॉ.श्रीकांत शिंदे फौंडेशन यांच्यावतीने सुरू करण्यात आलेल्या वैद्यकीय मदत कक्षाचे उद्घाटन व तापोळा ग्रामपंचायत अंतर्गत विविध विकासकामांचे उद्घाटन यावेळी करण्यात आले.

कोकण भाग पश्चिम महाराष्ट्राला जोडणार…

कांदाटी खोरे व त्यापलीकडील भाग हा कोकण म्हणून ओळखला जातो. त्यामुळे कोकण व पश्चिम महाराष्ट्र हा भाग लवकरच दळणवळणाच्या सर्व सोयींनी जोडला जाईल. यासाठी रस्ते व ठिकठिकाणी पुलांची देखील निर्मिती करण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

Back to top button