सातारा जिल्हा बँकेचा अमित शहा यांच्या हस्ते गौरव | पुढारी

सातारा जिल्हा बँकेचा अमित शहा यांच्या हस्ते गौरव

सातारा : पुढारी वृत्तसेवा : सातारा जिल्ह्यातील बँकिंग क्षेत्राचा कणा असलेल्या सातारा जिल्हा बँकेचा शुक्रवारी एका दशकातील सर्वोत्कृष्ट कामगिरीबद्दल केंद्रीय गृह व सहकार मंत्री ना. अमित शहा यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. जिल्हा बँकेचे अध्यक्ष नितीनकाका पाटील व मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र सरकाळे यांनी हा सन्मान स्वीकारला.

नवी दिल्ली येथील विज्ञान भवनात ग्रामीण सहकारी बँकांची राष्ट्रीय परिषद झाली. यामध्ये बँकेला हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी सहकार राज्यमंत्री ना. बी. एल. वर्मा, भारतीय रिझर्व्ह बँक आणि नाबार्डचे प्रतिनिधी यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने स्थापनेपासूनच चांगली कामगिरी केली आहे. सातारा जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी आणि प्रशासकीय अधिकार्‍यांनी बँकेचा नावलौकिक करण्यात मोलाची कामगिरी बजावली आहे. आतापर्यंत बँकेला 100 पुरस्कार मिळाले आहे.

सातारा जिल्हा बँक सहकारातील देशातील एक अग्रगण्य बँक आहे. त्यामुळे जिल्हा बँकेचा देशामध्ये आदर्श घेतला जातो. बँकेच्या कामगिरीमुळेच बँकेने पुरस्कारांची मालिका सुरू ठेवली आहे. नुकत्याच स्थापन झालेल्या सहकार मंत्रालयानेही सातारा जिल्हा बँकेच्या या कारभाराची दखल घेतली आहे. शुक्रवारी नवी दिल्ली येथील विज्ञान भवनात झालेल्या कार्यक्रमात पुन्हा एकदा जिल्हा बँकेचा देशपातळीवर गौरव झाला.

यावेळी ना. अमित शहा म्हणाले, सहकार मंत्रालय बळकट करण्यासाठी, पारदर्शकता आणण्यासाठी, आधुनिकीकरण, संगणकीकरण आणि स्पर्धात्मक सहकारी संस्था निर्माण करण्यासाठी निर्माण करण्यात आले आहे. ग्रामीण भागातील प्रत्येक वंचित व्यक्तीसाठी विकासाच्या सुलभतेचे आव्हान पेलण्यासाठी सहकार मंत्रालय सतत काम करेल. सातारा जिल्हा बँक जिल्ह्यासह देशाच्या विकासामध्ये महत्वाची भूमिका निभावत आहे. बँकेचे कामकाज देशात आदर्शवत असून सहकार बळकट करण्यासाठी मार्गदर्शक ठरेल.

डॉ. राजेंद्र सरकाळे म्हणाले, सहकारी बँकांचे देशाच्या ग्रामीण विकासात फार मोठे योगदान आहे. सहकार क्षेत्र संपूर्ण देशातच चांगले काम करत आहे, परंतु, काही आव्हानेही आहेत. संचालक मंडळाने आखून दिलेली ध्येय-धोरणे व त्यांची प्रभावी अंमलबजावणी, जिल्ह्यातील सर्वसामान्य शेतकर्‍यांची बँकेवर असलेली अढळ निष्ठा, आर्थिक शिस्त, विकास संस्था, सर्व सभासद संस्था, ग्राहक, कर्जदार, हितचिंतक यांच्या सदिच्छा यामुळेच बँक प्रगतीपथावर पोहोचली आहे.

या पुरस्काराबद्दल बँकेचे जेष्ठ संचालक आ. रामराजे नाईक-निंबाळकर, आ. बाळासाहेब पाटील, आ. शिवेंद्रराजे भोसले, आ. मकरंद पाटील आणि सर्व संचालक सदस्य, यांनी अभिनंदन केले.

Back to top button