सातारा : मायभूमीत भरपावसात मुख्यमंत्र्यांची मिरवणूक | पुढारी

सातारा : मायभूमीत भरपावसात मुख्यमंत्र्यांची मिरवणूक

बामणोली ; पुढारी वृत्तसेवा : महाबळेश्वर – जावलीच्या दर्‍याखोर्‍यातील भूमिपुत्र असलेले एकनाथ शिंदे गुरूवारी आपल्या मायभूमीत विसावताच डोंगरदर्‍यातही आनंदाची लकेर पसरली. कोयनाकाठाला उत्साह अन् जल्लोषाचे भरते आले. दरे तांबवासियांनी तर आपल्या या सुपुत्राची भरपावसात काढलेली मिरवणूक, त्यामध्ये देहभान हरपून सामील झालेले गावकरी हा भावूक सोहळा याची देही याची डोळा अनुभवताना उपस्थित सार्‍यांच्याच डोळ्यात आनंदाश्रूंनी गर्दी केली. रांगड्या मातीतील आपल्या हक्काचा भूमिपुत्र मुख्यमंत्री होवून गावाला आल्याच्या घटनेने सगळ्यांचीच छाती अभिमानाने फुलली.

मुख्यमंत्र्यांच्या गाडीवर फुलांचा सडा…

कांदाटी खोर्‍यात रात्री 10च्या सुमारास मुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे यांचे आगमन झाले. तापोळा येथून तराफ्यामधून मुख्यमंत्र्यांचा लवाजमा गाढवली येथे पोहोचला. तेथून ते दरे तांबला दाखल झाले. आपला हा सुपुत्र गावात मुख्यमंत्री होवून आल्याचा आनंद गावकर्‍यांच्या चेहर्‍यावरून ओसंडून वहात होता. तोबा गर्दीतच मुख्यमंत्र्यांची गावकर्‍यांनी मिरवणूक काढली. यावेळी त्यांचे स्वागत करण्यासाठी झुंबड उडाली होती.

हस्तांदोलनासाठी गर्दी

मुख्यमंत्र्यांशी हस्तांदोलन करून अभिनंदन करण्याची आस होती. त्यासाठी प्रत्येकजण धडपडत होता. गर्दीतून मार्ग काढत त्यांच्यापर्यंत पोहोचत होता.

जावयांचा मनोभावे सत्कार

गाढवली ही मुख्यमंत्र्यांची सासुरवाडी. येथे त्यांनी सहकुटुंब ग्रामदैवतेचे दर्शन घेतले. गावकर्‍यांनी जावयांचा मनोभावे सत्कारही केला. त्यानंतर मुख्यमंत्री दरे तांब येथे पोहोचले. त्यांच्यासोबत लोकांची प्रचंड गर्दी होती.

Back to top button