स्वातंत्र्यसैनिकांच्या संघर्षाचे स्मरण व्हावे | पुढारी

स्वातंत्र्यसैनिकांच्या संघर्षाचे स्मरण व्हावे

ढेबेवाडी ; विठ्ठल चव्हाण : देशाच्या स्वातंत्र्यासाठी स्वातंत्र्यसेनानी नाना पाटील यांच्यासह सातारा जिल्ह्यातील क्रांतीकारकांनी प्रखर लढा उभारला होता. यात ढेबेवाडी विभागातील स्वातंत्र्यसैनिकही कुठेही कमी पडले नव्हते. मात्र जुलमी इंग्रजांना सळो की पळो करून सोडणार्‍या स्वातंत्र्यसैनिकांचा आजच्या युवा पिढीला माहिती आहे का ? हा संशोधनाचा विषय आहे. त्यामुळेच हा इतिहास काळाच्या ओघात लुप्त होणार नाही ? यासाठी विशेष प्रयत्न गरजेचे आहेत.

ढेबेवाडी विभागातील मानेगांव, कुंभारगाव, मालदन, जानुगडेवाडी अशा काही गावातील निर्भीड आणि निधड्या छातीचे तरूण वेळ प्रसंगी छातीवर गोळ्या झेलण्याची तयारी ठेऊनच या स्वातंत्र्य लढ्यात उतरले होते. जानुगडेवाडी येथील आबासाहेब जानुगडे व त्यांचे सहकारी यांचा या चळवळीतील लढा फारच संघर्षमय आहे. आबासाहेब 1942 च्या स्वातंत्र्य लढ्यात सक्रिय झाले. त्यांनी पाटण तहसील कचेरीवर तिरंगा फडकवण्याच्या प्रकरणात त्यांना एक वर्षाच्या सक्त मजुरीची शिक्षा झाली होती.

त्यावेळी जानुगडेवाडी येथील परशुराम सखाराम जानुगडे, रामचंद्र परशराम जानुगडे, पांडुरंग बळवंत शेवाळे, रामा कृष्णा जानुगडे, विठ्ठल मारूती जानुगडे, शंकर पांडुरंग रामोशी तसेच सुभाषचंद्र बोस यांच्या सेनेतील कॅप्टन विष्णू तात्या जानुगडे या स्वातंत्र्यसैनिकांनी मोलाची साथ दिली होती.

ढेबेवाडी विभागातील मानेगाव सुद्धा स्वातंत्र्यसैनिकांची पंढरीच झाली होती. गावातील 21 हून अधिक स्वातंत्र्यसैनिक इंग्रजांविरूद्ध उभे ठाकले होते. त्यात प्रामुख्याने रघुनाथ मोरे, बाबूराव चिवटे, महादेव मोरे, धोंडिराम माने व शंकर कृष्णा माने, खतीब मिस्री, रामचंद्र माने (गुरूजी) रामचंद्र ज्ञानदेव शिंदे, पिलाजी नारायण माने, बापू पांडुरंग माने व अन्य सर्व स्वातंत्र्यसैनिकांनी क्रांतीसिंह नाना पाटील यांच्या आदेशाने प्रत्यक्ष लढ्यात उतरून तर काहींनी भूमिगत राहून काम केले होते.

कराडजवळील शिरवडे रेल्वे स्टेशन जाळणे व लुटणे, कोळे येथील पोष्ट कार्यालय फोडणे व लुटने, इंग्रजांच्या ढेबेवाडी येथील कार्यालयावर तिरंगा फडकावणे, प्रचार सभा व प्रभात फेरी काढून स्वातंत्र्य लढ्याबाबत जनजागृती करण्यात ते सर्व आघाडीवर होते. त्यामुळेच या स्वातंत्र्यसैनिकांपैकी कुणाला सहा वर्षे, तर कुणाला सहा महिने व कुणाला साडेसहा वर्षै शिक्षाही झाली होती.

मालदन, सणबूर, कुंभारगांव, विंग, कोळे या विविध गावच्या तरूणांनीही स्वातंत्र्यलढ्यात झोकून दिले होते. यात रामचंद्र कुलकर्णी, शंकर आकोबा देसाई, हणमंत यशवंत देसाई, बंडू तुकाराम काळुगडे, ज्ञानु बापू गायकवाड, परशराम सखाराम चव्हाण, केशव बळवंत खटावकर, काशिनाथ जोशी, विठ्ठल नारायण कुलकर्णी हे कुंभारगाव येथील स्वातंत्र्य सैनिक इंग्रजांविरोधात लढा देत होतेच. पण त्यांना गणपती विठ्ठल काळे, बाबुराव बाळा काळे, मालदनचे पांडुरंग नाना साळुंखे हे आघाडीवर राहून स्वातंत्र्य लढ्याची प्रेरणा ठरले होते. विंग येथील रामू मारूती कणसे, खाशाबा बाळा गरूड, सणबूरचे लक्ष्मण मारूती जाधव, बाळकू बुआजी जाधव, साईगडे येथील सखाराम विठ्ठल यादव, खाशाबा बाळा पाटील आणेकर अशा शेकडो तरुणांच्या झुंडी इंग्रजी सत्तेशी टक्कर देऊन लढ्याची प्रेरणाही देत होते. मात्र स्वातंत्र्य लढ्याचा इतिहास आज आहे कुठे ? पाठ्यपुस्तकातही इतिहास दिसत नाही. त्यामुळे युवा पिढीला याचे स्मरण कसे राहणार ? याचा राज्यकर्त्यांनी विचार करणे आवश्यक आहे.

Back to top button