सैनिकी परंपरेचा सातारा जिल्हा | पुढारी

सैनिकी परंपरेचा सातारा जिल्हा

सातारा; पुढारी वृत्तसेवा : ‘राकट देशा, कणखर देशा, महाराष्ट्र देशा’, असे वर्णन केलेल्या महाराष्ट्राच्या उभारणीत सातारा जिल्ह्याने आर्थिक, सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, क्रीडा क्षेत्रात भर घातली. त्यामध्ये जिल्ह्यातील आजी-माजी सैनिकांचे योगदान राहिले आहे. देशाची सीमा सुरक्षित करतानाच जिल्ह्यात शांतता, सामाजिक शांततेचा भंग होणार नाही याची काळजी घेत जिल्ह्यातील आजी-माजी सैनिकांनी प्रगतीत हातभार लावला. जिल्ह्यात 19 हजार 224 माजी सैनिक असून सर्वाधिक संख्या सातारा तालुक्यातील आहे.

सातारा जिल्ह्यातील माजी सैनिकांमध्ये आर्मी, नेव्ही, एअरफोर्समधून निवृत्त झालेल्या सैनिकांचा समावेश आहे. जिल्ह्यातील या सैनिकांनी 1948, 1961, 1962, 1971, 1999 या युद्धांमध्ये निरनिराळ्या लढायांमध्ये व आघाड्यांमध्ये भाग घेऊन जिल्ह्याची लौकिक वाढवला. देशाला स्वातंत्र्य मिळण्यापूर्वी इंग्रजांनी महाराष्ट्रातील सैनिकांचे गुण ओळखून जवानांना प्राधान्य दिले. देशसेवेत असणार्‍या जवानांनी आजही मराठी बाणा जपला आहे. भारतभूमीच्या संरक्षणात दिलेल्या योगदानाची दखल घेऊन जिल्ह्यातील अनेक सैनिकांना शौर्यपदकांनी सन्मानित केले आहे.

देशसेवा बजावून संरक्षण खात्यातून प्रत्येक वर्षी आर्मी, नेव्ही आणि एअरफोर्समधून अनेक सैनिक सेवानिवृत्त होऊन मायभूमीत परतत आहेत. अत्यंत उमेदीच्या वयात देशाची सेवा केल्यानंतर वयाच्या 35 ते 40 वर्षादरम्यान हे सैनिक निवृत्‍त होतात. सेवानिवृत्तीनंतर खर्‍या अर्थाने त्यांच्या कौटुंबिक जबाबदार्‍या सुरु होतात. स्वत:चे घर, मुलांचे शिक्षण व लग्न, प्रॉपर्टी नावे करणे आदी कामे ते करतात. सुरुवातील संरक्षण खात्यात काम केल्यानंतर निवृत्तीनंतर सिव्हिलीयन लोकांशी जुळवून घेताना त्यांना कसरत करावी लागते. मात्र जिल्ह्याच्या विकासात आजी-माजी सैनिकांचे अनन्यसाधारण महत्त्व राहिले आहे.

Back to top button