साबळेवाडी परिसरात मुसळधार | पुढारी

साबळेवाडी परिसरात मुसळधार

कण्हेर : पुढारी वृत्तसेवा साबळेवाडी व परिसरात वादळी वार्‍यासह जोरदार पाऊस पडला. वार्‍यामुळे साबळेवाडी-वेळे कामथी रस्त्यावर मोठे झाड उन्मळून पडले. यामुळे येथील वाहतूक सुमारे तीन तास ठप्प झाली. नुने येथेही विजेचे दोन खांब पडल्याने बुधवारी दिवसभर परिसरातील वीज गायब होती. सुसाट वार्‍याने उसाची पिकेही भुईसपाट झाली आहेत. गेल्या तीन दिवसांपासून पुन्हा दमदार पावसास सुरुवात झाली आहे. जोरदार वार्‍यासह पडलेल्या पावसाने आगुंडेवाडीनजीक रस्त्यावर बाभळीचे झाड उन्मळून पडले. यामुळे येथील वाहतूक सुमारे एक तास ठप्प झाली होती. या भागात पडत असलेल्या जोरदार पावसामुळे परिसरातील ओढे व नाले तुडुंब भरून वाहत आहेत. शेतीच्या सखल भागात पाणी साचले आहे.

बाभळीचे झाड पडल्याचे नागरिकांनी बांधकाम विभागाला कळवल्यानंतर त्यांनी ते झाड हटवून दुपारपर्यंत वाहतूक सुरळीत केली. कण्हेर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस पडत असल्याने धरणात पाण्याची आवक वाढली आहे. कण्हेर धरणातून पाण्याचा विसर्ग वेण्णा नदीपात्रात सुरू आहे. यामुळे वेण्णा नदी दुथडी भरून वाहत आहे. या भागातील हामदाबाज ते किडगाव पूल पाण्याखाली गेला आहे. यामुळे या मार्गावरील वाहतूक बंद झाली आहे.

जुन्या झाडांपासून जीवाला धोका

साबळेवाडी ते वेळेकामथी हा राज्यमार्ग नुकताच नव्याने करण्यात आला आहे. या मार्गावरील आंबा व चिंचेची मोठी झाडे जीर्ण झाली आहेत. जोरदार वार्‍याने कोणत्याही क्षणी ही झाडे पडून प्रवासी व वाहन चालकांच्या जीवाला धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. ही जुनी झाडे बांधकाम विभागाने त्वरीत हटवावीत अशी मागणी होत आहे.

कण्हेरचा विसर्ग वाढवला

कण्हेर परिसरात गेल्या चार दिवसांपासून पावसाची रिपरिप कायम आहे. शिवाय धरण पाणलोट क्षेत्राच्या पश्चिमेकडे असलेल्या मेढा-महाबळेश्वर भागात पर्जन्यवृष्टी होत असल्याने पाण्याची आवक प्रति तास 9500 क्यूसेक्स होत आहे. त्यामुळे सध्या धरण 83 टक्के भरले आहे. धरण व्यवस्थापनाने पाण्याची पातळी स्थिर ठेवण्यासाठी बुधवारी सकाळी 11 वाजता पाण्याचा विसर्ग वाढवून 7608 क्यूसेक्स सांडव्यावरून व 550 कयुसेक्स विद्युत पायथागृहातून धरणातील पाणी सोडले आहे. यामुळे धरणातून एकूण 8158 क्यूसेक्स इतका पाण्याचा विसर्ग वेण्णा नदीमध्ये केला जात आहे. यामुळे सध्या वेण्णा नदी तुडुंब भरून वाहत असून किडगाव ते हमदाबाज व म्हसवे येथील पूल पाण्याखाली गेले आहेत. यामुळे तेथील लोकांचा संपर्क तुटून सातारकडे जाण्यासाठी लांब पल्ल्याचा वापर करावा लागत आहे. बुधवारी दिवसभर सोसाट्याच्या वार्‍यासह संततधार पाऊस सुरू असल्याने हवेत गारवा निर्माण झाला आहे. पावसामुळे जनजीवन विस्कळीत होऊन शेतातील कामे ठप्प झाली आहेत.

Back to top button