सातारा : महामार्ग सेवारस्त्यांची ऐशी की तैशी | पुढारी

सातारा : महामार्ग सेवारस्त्यांची ऐशी की तैशी

तासवडे टोलनाका; पुढारी वृत्तसेवा : वहागाव, वनवासमाची, खोडशी,बेलवडेहवेली, तासवडे या परिसरात गेल्या चार दिवसापासून मुसळधार पाऊस पडत आहे. यामुळे पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गाच्या सेवारस्त्याची अक्षरश: चाळण झाली आहे. ओढे, नाले आणि मोरींच्या पुलाजवळ चिखल ,माती आणि कचर्‍याचे प्रचंड साम्राज्य पसरले आहे. यामुळे सेवा रस्त्यावरून प्रवास करताना वाहनचालकांना अक्षरश: जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत असुन महामार्गाच्या सेवा रस्त्यांची परिस्थिती ‘ऐशी की तैशी’ झाली आहे.

गेल्या चार दिवसापासून तासवडे, बेलवडेहवेली ,वहागाव, खोडशी, वनवासमाची या परिसराला मुसळधार पावसाने झोडपून काढले आहे. यामुळे या परिसरातील ओढे, नाले तुडुंब भरून वाहत आहेत. दरम्यान पुणे — बेंगलोर महामार्ग सेवारस्त्यापेक्षा पाच ते दहा फूट उंचावरून गेला आहे तर सेवारस्ते खाली आहेत. या ठिकाणी ओढे,नाले यासाठी लहान पूल बांधण्यात आले आहेत. पावसामुळे सेवारस्त्यावर ओढे नाल्यांमधून आलेली घाण साठली असून चिखल, माती, दगडे, प्लास्टिक कचरा यासह अनेक वस्तूचां सेवा रस्त्यावर अक्षरशः थर साचला आहे. सेवारस्त्यांचा वापर स्थानिक नागरिक, शेतकरी, प्रवासी वाहतूक करणार्‍या रिक्षा ,एसटी यासह दुचाकी चालक करत असतात.

दाद कोणाकडे मागायची; वाहनधारकांना प्रश्‍न

सेवा सुविधा बाबत नेहमीच दुर्लक्ष करत वाहन चालकच्यांकडून मात्र हजारो कोटी रुपये टोल वसूल करण्यात येत आहे. दरम्यान गेल्या महिन्यात पुणे बेंगलोर महामार्ग रस्ते विकास महामंडळाकडून महामार्ग प्राधिकरणाकडे वर्ग झाला आहे. त्यामुळे नक्की दाद मागायची कुणाकडे महामार्ग प्राधिकरण की रस्ते विकास महामंडळ असा सवाल शेतकर्‍यांनी विचारला आहे.

Back to top button