सातारा : कण्हेर धरणातून पुन्हा विसर्ग सुरू | पुढारी

सातारा : कण्हेर धरणातून पुन्हा विसर्ग सुरू

कण्हेर: पुढारी वृत्तसेवा : कण्हेर धरण परिसरात रविवारी दुपारपासून पुन्हा संततधार पाऊस सुरू झाल्याने धरण 79 टक्के टक्के भरले आहे. शिवाय धरण पाणलोट क्षेत्रात वरून येणाऱ्या पाण्याची आवक 9415 क्यूसेक प्रति तास होत आहे. यामुळे धरणातील निर्धारित पाण्याची पातळी स्थिर ठेवण्यासाठी धरणातून मंगळवारी (दि.९) दुपारी 3 वा. चारीही दरवाजे उघडण्यात आले. सांडव्यावरून वेण्णा नदी पात्रात 2266 क्युसेक विसर्ग सुरू झाला आहे. तसेच वीज निर्मितीसाठी धरण पायथा विद्युत ग्रहातून 550 क्युसेक पाणी सोडण्यात आले आहे.

परिसरात सोमवारी एकूण 54 मिमी इतका पाऊस पडला. मंगळवारी पावसाची संततधार कायम आहे. त्यामुळे धरणातील पाण्याच्या पातळीत वाढ होऊन 687.45 मीटर इतकी झाली आहे. सध्या धरणातील पाण्याचा साठा हा 228.39 दलघमी इतका झाला असून धरण 8.07 टीएमसी इतके भरले आहे. त्यामुळे मंगळवारी सकाळी 11 वा. विद्युत ग्रहातून कालव्याद्वारे वेण्णा नदी पात्रात 550 क्युसेक इतके पाणी सोडण्यात आले आहे. तर दुपारी 3 च्या सुमारास धरणाच्या दरवाजा क्र.1 व 4 0.30 मीटरने, तर क्र. 2 व 3 दरवाजे 0.20 मीटरने उचलून 2266 क्यूसेक पाणी वेण्णा नदी पात्रात सोडण्यात आले आहे.

सातारच्या पश्चिमेकडे पुन्हा पावसाला सुरुवात झाली असून, गेल्‍या तीन दिवसांपासून सतत पाऊस पडत आहे. त्यामुळे धरण क्षेत्रात पाण्याची आवक मोठी होत आहे. तसेच यंदा मान्सूनमध्ये 495 मिमी इतकी पावसाची नोंद झाली आहे. त्यामुळे मंगळवारी दुपारी धरणावरील सायरन वाजवून एकूण 2816 क्युसेक पाणी वेण्णा नदी पात्रात सोडण्यात आले आहे. यामुळे वेण्णा नदी दुथडी भरून वाहत असून नदीकाठच्या गावांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे. पावसाचा जोर कायम राहिल्यास जादा पाणी सोडण्यात येणार असल्याची माहिती धरण प्रशासनाच्या वतीने देण्यात आलेली आहे.

हेही वाचलंत का ? 

Back to top button