शिवांजलीच्या पदाधिकार्‍यांची वाहने जप्‍त | पुढारी

शिवांजलीच्या पदाधिकार्‍यांची वाहने जप्‍त

मारूल हवेली : पुढारी वृत्तसेवा नाडे (नवारस्ता, ता. पाटण) येथील शिवांजली पतसंस्थेच्या 17 कोटीच्या अपहार प्रकरणाच्या पार्श्‍वभूमीवर सातारा अर्थिक गुन्हे शाखेकडून संस्थेचे संस्थापक, चेअरमन व व्यवस्थापक यांच्या मालकीच्या चारचाकी व दुचाकी वाहनांवर जप्तीची कारवाई केली आहे. याप्रकरणी आणखी काही मालमत्ता जप्त केली जाणार असल्याचे संकेत अर्थिक गुन्हे शाखेच्या अधिकार्‍यांनी दिले आहेत.

शिवांजली पतसंस्थेत समारे 17 कोटीचा अपहार झाल्याचा ठपका ठेवण्यात आला होता. लेखा परिक्षकांनी दिलेल्या फिर्यादीवरून संस्थेचे संस्थापक, चेअरमन, व्हाईस चेअरमन, व्यवस्थापक व संचालक मंडळ अशा एकूण 14 जणा विरोधात फसवणुकीसह अन्य काही कलमान्वये मल्हारपेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. मल्हारपेठ पोलिसांनी हा गुन्हा सातारा आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग केला असून याप्रकरणी आता आर्थिक गुन्हे शाखेकडून या प्रकरणाचा सखोल तपास सुरू आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मागील दोन दिवसांपासून संबंधित अधिकार्‍यांकडून नवारस्ता परिसरात कारवाई सुरू असून संस्थेचे संस्थापक, चेअरमन व व्यवस्थापक यांच्या मालकीची चार चारचाकी वाहने व एक दुचाकी अशी पाच वाहने ताब्यात घेण्यात आली आहेत. या वाहनांची किंमत सुमारे 40 लाखाच्या घरात असल्याचे आर्थिक गुन्हे शाखेकडून सांगितले जात आहे.

जप्‍त केलेल्या वाहनांमध्ये एक डंपर, एक स्कॉर्पिओ, एक महिंद्रा इनव्हेंडर, एक कार व दुचाकी या पाच गाड्यांचा समावेश आहे. मागील दोन दिवसांपासून आर्थिक गुन्हे शाखेकडून ही कारवाई सुरु असून सशंयीत आरोपी जयंत देवकर, दादासहेब माथणे व्यवस्थापक अभिजित देवकर हे अद्यापपर्यंत मिळून आले नसल्याचे सांगण्यात आले. तर संबंधितांच्या कन्स्ट्रक्शन विभागातील अजून काही वाहने व मालमत्ता जप्त करणार असल्याचे संकेत अर्थिक गुन्हे शाखेच्या अधिकार्‍यांकडून मिळाले असून पुढील कारवाईकडे परिसरातील नागरिक, ठेवीदारांसह सभासदांचे लक्ष लागून राहिले आहे. त्याचबरोबर आपल्या ठेवी केव्हा मिळणार ? हा अनुत्तरीत प्रश्‍न आजही कायम आहे.

Back to top button