चुलीवर भाकरी भाजून काँग्रेसतर्फे निषेध | पुढारी

चुलीवर भाकरी भाजून काँग्रेसतर्फे निषेध

सातारा : पुढारी वृत्तसेवा जीवनावश्यक वस्तूंवर जीएसटीच्या माध्यमातून कर लादल्याने महागाईत वाढ झाली आहे. या निषेधार्थ काँग्रेसच्यावतीने सातार्‍यात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर चुलीवर भाकरी भाजून अनोखे आंदोलन केले. यावेळी केंद्र शासनाच्या विरोधात घोषणाबाजी करून कार्यकर्त्यांनी आपला रोष व्यक्त केला. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर चुलीवर भाकरी भाजून केंद्र सरकारचा निषेध व्यक्त केला. राहुल गांधी तुम आग बडो, हम तुम्हारे साथ है, मोदी सरकार हाय हाय, मोदी सरकारचे करायचे काय, खाली मुंडी वर पाय, राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचा विजय असो अशा घोषणा देण्यात आल्या. दरम्यान, यावेळी आंदोनकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेऊन सोडून दिली.

केंद्रातील सरकार प्रत्येक गोष्टीवर जीएसटीच्या माध्यमातून कर आकारून जनतेला त्रस्त करत आहे. आधीच महागाईने कंबरडे मोडले असताना सरकारने खाण्याच्या वस्तूंवरदेखील जीएसटी लावला आहे. विशेष म्हणजे आरोग्य सेवांसाठीही आता कर द्यावा लागणार आहे.या सरकारला महागाईचे सोयरसुतक नसून सरकारमधील काही मंत्री संतापजनक वक्‍तव्ये करून जनतेच्या भावनांशी खेळत आहेत, असा आरोपही आंदोलनकर्त्यांनी यावेळी केला. यावेळी जिल्हाध्यक्ष डॉ. सुरेश जाधव, महिला जिल्हाध्यक्षा अल्पना यादव, भानुदास माळी, नरेश देसाई, अरबाज शेख, मनोज तपासे, धनश्री महाडिक, सुषमा राजेघोरपडे, रजिया शेख, मनीषा पाटील, मालन परळकर आदी उपस्थित होते.

Back to top button